
दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर काल भारताचा नामीबिया विरुद्ध सामना झाला. टीम इंडियाने ही मॅच आरामात मोठ्या फरकाने जिंकली. क्रिकेटच्या भाषेत टीम इंडियाने नामीबियावर 93 धावांनी दणदणीत विजय मिळवला. पण या विजयानंतरही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पाकिस्तान विरुद्ध 15 फेब्रुवारीला रविवारी होणाऱ्या सामन्याआधी टीम इंडियाला या प्रश्नांवर उत्तरं शोधावी लागतील. नामीबिया विरुद्ध जिंकलो असलो, तरी पाकिस्तान विरुद्ध मॅचआधी हा एक इशाराच आहे. नामीबिया विरुद्ध मिळवलेला विजय हा टीम इंडियासाठी टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील मोठा विजय आहे. याआधी 2012 साली टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमने कोलंबो येथे इंग्लंडला 90 धावांनी हरवलं होतं. नामीबिया विरुद्ध जिंकूनही टीम इंडियाच्या विजयात अनेक कमतरता आहेत. हद्द तेव्हा झाली अखेरीस भारताने 5 रन्स बनवण्यासाठी 5 विकेट गमावल्या.
अमेरिकेविरुद्ध सामन्यातही भारतीय टीमचं लोअर मिडिल ऑर्डर फुस्स ठरलं होतं. त्यावेळी सुद्धा अक्षर पटेल, रिंकू सिंही बॅट चालली नव्हती. नामीबिया विरुद्धही ते चालले नाहीत. अक्षरने गोलंदाजीत जरुर दम दाखवला. या सामन्यात ओपनर इशान किशनने 24 चेंडूत 61 धावांची खेळी केली. पावरप्लेमध्ये मॅचची दिशा निश्चित केली. त्यानंतर हार्दिक पंड्याने 28 चेंडूत 52 धावा ठोकून लास्ट ओव्हर्समध्ये पेस कायम ठेवला. सुरुवात जशी झाली होती ते पाहता टीम इंडियाची धावसंख्या 250-270 च्या पण पुढे जायला पाहिजे होती. पण 209/9 हा टीम इंडियाला साजेसा आकडा नाहीय. मधल्या षटकात टीमची लय बिघडली. भारतीय टीमने 6.5 ओव्हर्समध्येच 100 धावा स्कोरबोर्डवर लावल्या होत्या.
टीम इंडियासाठी हा धोक्याचा इशारा
संजू सॅमसनने तीन सिक्ससह जोरदार सुरुवात केली. पण 22 धावांवर सोपी कॅच देऊन तो पॅव्हेलियनमध्ये परतला. अभिषेक शर्माच्या जागी खेळणाऱ्या संजूकडे वर्ल्ड कप डेब्यूमध्ये स्वत:ला सिद्ध करण्याची संधी होती. पण तो असं काही करु शकला नाही, ज्यासाठी त्याची इनिंग लक्षात ठेवली जाईल. नामीबियाचा कॅप्टन गेरहार्ड इरास्मसने आपल्या ऑफस्पिन गोलंदाजीने टीम इंडियाच्या फलंदाजांना चांगलचं हैराण केलं. त्याने चार ओव्हर्समध्ये 20 धावा देऊन चार विकेट काढल्या. नामीबियापेक्षा पाकिस्तान एक मजबूत संघ आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा धोक्याचा इशारा आहे.