IndvsSA | मयांकचं द्विशतक, भारताचा धावांचा डोंगर, आफ्रिकेची दयनीय अवस्था

| Updated on: Oct 03, 2019 | 7:06 PM

भारताचं भलं मोठं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या आफ्रिकन फलंदाजांची दिवसअखेर तारांबळ उडाली. दुसऱ्या दिवशी खेळ थांबला त्यावेळी आफ्रिकेची अवस्था 3 बाद 39 अशी दयनीय होती.

IndvsSA | मयांकचं द्विशतक, भारताचा धावांचा डोंगर, आफ्रिकेची दयनीय अवस्था
Follow us on

India vs South Africa test विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाने ( India vs South Africa test) धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल यांची त्रिशतकी भागीदारीमुळे भारताने 500 धावांचा टप्पा पार केला. भारताने पहिला डाव 7 बाद 502 धावांवर घोषित केला. मयांक अग्रवालने 215 तर रोहित शर्माने 176 धावा ठोकल्या.

भारताचं भलं मोठं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या आफ्रिकन फलंदाजांची दिवसअखेर तारांबळ उडाली. दुसऱ्या दिवशी खेळ थांबला त्यावेळी आफ्रिकेची अवस्था 3 बाद 39 अशी दयनीय होती.

भारताने आज बिनबाद 202 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. मयांक आणि रोहित शर्माने आफ्रिकन गोलंदाजांची धुलाई केली. काल शतक पूर्ण केलेल्या रोहितने आज फटकेबाजी केली. तर मयांक अग्रवालने आपलं शतक पूर्ण करुन घेतलं. मयांकने 204 चेंडूत 100 धावा केल्या.

आफ्रिकन गोलंदाजांना काही केल्या विकेट मिळत नव्हती. अखेर भारताची धावसंख्या 317 झाली असताना त्यांना पहिलं यश मिळालं. द्विशतकाकडे वाटचाल करणारा रोहित शर्मा 176 धावांवर बाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजारा अवघ्या 6 धावा करुन माघारी परतला. त्यानंतर कोहली आणि मयांकने डाव सावरला. एकीकडे मयांक फटकेबाजी करत होता, तर दुसरीकडे कोहली त्याला संयमी खेळी करुन साथ देत होता. मात्र कोहलीलाही मोठी खेळी करता आली नाही. तो 20 धावा करुन मुथूसामीचा शिकार ठरला.  यानंतर अजिंक्य रहाणेच्या साथीने मयांकने द्विशतक पूर्ण केलं. रहाणेही 15 धावा करुन बाद झाला. त्यानंतर अखेर मयांकची विकेट घेण्यात आफ्रिकेच्या डीन एल्गरला यश आलं. मयांकने 371 चेंडूत 23 चौकार आणि 6 षटकारांच्या सहाय्याने 215 धावा केल्या.

हनुमा विहारी 10, रिद्धीमान साहा 21 धावा करुन माघारी परतले. भारताने जाडेजाने 46 चेंडूत नाबाद 30 तर अश्विन 17 चेंडूत 1 धाव करुन नाबाद राहिला.

आफ्रिकेचे तीन फलंदाज झटपट तंबूत

दरम्यान, भारताच्या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकन फलंदाजांची दाणादाण उडाली. अश्विन आणि जाडेजा या जोडगोळीने त्यांचे 3 फलंदाज अवघ्या 34 धावांत माघारी धाडले. अश्विनने 2 तर जाडेजाने 1 विकेट घेतली.