Irfan Pathan Retire : इरफान पठाणचा क्रिकेटला अलविदा, निवृत्तीची घोषणा

| Updated on: Jan 04, 2020 | 6:29 PM

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने (Irfan Pathan Retire) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. 35 वर्षीय इरफानने क्रिकेटला गुडबाय केला आहे.

Irfan Pathan Retire : इरफान पठाणचा क्रिकेटला अलविदा, निवृत्तीची घोषणा
Follow us on

मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने (Irfan Pathan Retire) क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. 35 वर्षीय इरफानने क्रिकेटला गुडबाय केला आहे. इरफानने (Irfan Pathan Retire) टीम इंडियाकडून शेवटचा सामना 8 वर्षांपूर्वी म्हणजे ऑक्टोबर 2012 मध्ये खेळला होता. कोलंबोमध्ये टी 20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना इरफानचा शेवटचा सामना ठरला. त्यानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळालं नाही. इतकंच नाही तर इरफानने गेल्या महिन्यात झालेल्या आयपीएल लिलावातूनही स्वत:ला बाजूला ठेवलं होतं. आज अखेर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

इरफानने देशांतर्गत क्रिकेटमध्ये फेब्रुवारी 2019 मध्ये सय्यद मुश्ताक अली चषकात जम्मू काश्मीरचं प्रतिनिधीत्व केलं होतं. डावखुरा स्विगं गोलंदाज असलेल्या इरफानने 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अॅडिलेड कसोटीतून पदार्पण केलं होतं. डावखुरा स्विंग गोलंदाज म्हणून इरफानने तुफानी कामगिरी करत अल्पावधीतच नावलौकिक मिळवला होता.

इरफानची तुलना माजी कर्णधार कपिल देव तसंच पाकिस्तानचा माजी कर्णधार वासिम आक्रमसोबतही केली जात होती. कपिल देव यांच्यानंतर एक उत्तम अष्टपैलू खेळाडू म्हणून इरफान पठाणकडे पाहिलं जात होतं.

इरफानने 29 कसोटी सामन्यात 1105 धावा केल्या असून 100 विकेट घेतल्या आहेत. तर 120 वन डे सामन्यात इरफानने 1544 धावा करताना, तब्बल 173 विकेट आपल्या नावे केल्या आहेत. इरफान पठाण 24 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला. यामध्ये त्याने 172 धावा केल्या तर 28 विकेट पटकावल्या.

इरफान पठाण हा भारताने 2007 मध्ये जिंकलेल्या टी 20 विश्वचषकात भारतीस संघात होता. इतकंच नाही तर फायनलमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात इरफान पठाणने  जबरदस्त कामगिरी केल्याने तो मॅन ऑफ द मॅच ठरला होता. इरफानने 2006 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात जबरदस्त कामगिरी करत हॅटट्रिक केली होती. इरफानने सलग तीन विकेट घेतल्या होत्या.