भारतीय मुलीशी विवाह, 800 विकेट, 14000000000 रुपयांचा व्यवसाय; कोण आहे चेन्नईचा जावई?

क्रिकेटच्या इतिहासात 800 कसोटी विकेट घेणाऱ्या एकमेव गोलंदाज मुथैया मुरलीधरनचा आज वाढदिवस. त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल, लग्नजीवनाबद्दल आणि उद्योगपती म्हणून यशस्वी प्रवासाबद्दल या लेखात माहिती आहे. त्यांचा चेन्नई सुपर किंग्ज आणि इतर आयपीएल संघासोबतचा प्रवासही यात समाविष्ट आहे.

भारतीय मुलीशी विवाह, 800 विकेट, 14000000000 रुपयांचा व्यवसाय; कोण आहे चेन्नईचा जावई?
मुथैया मुरलीधरन
Image Credit source: social media
| Updated on: Apr 17, 2025 | 12:21 PM

कसोटी सामन्यात 800 विकेट घेणारा जगातील एकमेव गोलंदाज मुथैया मुरलीधरन (Muttaih Muralitharan Birthday)चा आज वाढदिवस आहे. श्रीलंकेच्या कँडीमध्ये 17 एप्रिल 1972 रोजी जन्मलेला मुरली आता 52 वर्षाचा झालाय. चित्रविचित्र अॅक्शन करणाऱ्या या राईट आर्म ऑफब्रेक फिरकी मास्टरचं भारताशी घनिष्ठ नातं आहे. ऑस्ट्रेलियाच्या विरोधात 1992मध्ये कसोटी पदार्पण करणाऱ्या मुरलीने भारता विरोधातच पहिला वनडे आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. 12 ऑगस्ट 1993 रोजी झालेल्या या सामन्यात मुरलीला केवळ एक विकेट मिळाला होता. तेव्हा हाच मुरलीधरन पुढे आंतरराष्ट्रीय सामन्यात 1347 विकेट घेईल हे कुणालाही वाटलं नसेल.

मुथैया मुरलीधरनचं लग्न चेन्नईच्या मधिमलार राममूर्तीशी झालंय. मधिमलार ही जगप्रसिद्ध मलार समूहाच्या रुग्णालयाचे संस्थापक डॉ. एस. राममूर्ती आणि त्यांची पत्नी डॉ. नित्या राममूर्ती यांची मुलगी आहे. मुरलीधरन आणि मधिमलारच्या लग्नाची गोष्ट एखाद्या फिल्मी कहाणीपेक्षा वेगळी नाहीये. या लग्नासाठी प्रसिद्ध तमिळ अभिनेता वागई चंद्रशेखरने महत्त्वाचा पुढाकार घेतला होता. चेन्नईच्या सन टीव्ही नेटवर्कच्या स्टुडिओत मुरलीधरन अचानक आला होता. तेव्हा वागई चंद्रशेखरसोबत त्याची भेट झाली होती. त्यावेळी मुरलीधरनने त्याची आई चंद्रशेखरची किती फॅन आहे हे त्याने सांगितलं होतं. त्यानंतर दोघे चांगले मित्र झाले. त्यानंतर चंद्रशेखर मुरलीधरनच्या आईला भेटले. तेव्हा मुरलीधरनच्या आईने आम्ही मुरलीधरनसाठी मुलीच्या शोधात आहोत, असं सांगितलं. त्यावेळी चंद्रशेखरने पहिल्यांदाच मधिमलारचा उल्लेख केला. तिला आपण लहानपणापासून ओळखतोय असं सांगितलं.

पहिल्या भेटीतच फिदा

मधिमलारचे कुटुंबही तिच्यासाठी वर शोधत होतेच. त्यानंतर मुरलीधरनच्या आईने त्याला मधिमलारच्याबाबत सांगितलं. पण सुरुवातीला त्याने लग्नासाठी काही इंटरेस्ट दाखवला नाही. कारण त्याला त्याच्या करिअरवर लक्ष द्यायचं होतं. अनेकदा आईने समजावल्यानंतर त्याने मधिमलारला भेटण्याचा निर्णय घेतला. दोघेही एकमेकांना भेटले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. पहिल्या भेटीतच मुरलीधरनने मधिमलारला साखरपुड्याची अंगठीच घातली. त्यानंतर त्यांनी 21 मार्च 2005मध्ये चेन्नईत पारंपारिक पद्धतीने तामिळ रितीरिवाजानुसार लग्न केलं. या दोघांना नरेन आणि कृषा ही दोन मुले आहेत.

चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळला

2008मध्ये इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात झाली. त्यावेळी धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपरकिंग्जने अनेक दिग्गज खेळाडूंना साईन केलं. श्रीलंकेचा महान स्पिनर मुथैया मुरलीधरनलाही साईन करण्यात आलं होतं. त्याला 4.5 कोटीत खरेदी करण्यात आलं होतं. 2010मध्ये सीएसकेसोबत आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर 2011मध्ये त्याला नवीन फ्रेंचाईजी कोक्टी टस्कर्स केरळसाठी साइन करण्यात आले. 2021-2014 पर्यंत तो आरसीबीसाठी खेळला. त्याने 66 सामन्यात 63 बळी घेतले. तो बराच काळ सनराईजर्स हैदराबाद कोचिंग स्टाफचा भाग होता आणि खेळाडूंना तयार करत होता.

नंतर बनला बिझनेसमन

त्याने त्याच्या 20 वर्षाच्या आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये 133 टेस्ट, 350 वनडे आणि 12 टी-20 सामने खेळले. टेस्टमध्ये सर्वाधिक 67 वेळा पाच विकेट घेण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. 22 वेळा 10 विकेट घेणाऱ्या मुरलीने संन्यास घेतल्यानंतर आयुष्याचा दुसरा डाव सुरू केला. त्यातही त्याने यश मिळवलं. मुरलीधरन आता उद्योगपती झालाय. त्याच्या कंपनीचं नाव मुथैया बेव्हरेजेस अँड कन्फेक्शनरी आहे. त्याने भारतात कर्नाटकात व्यवसायही सुरू केला आहे. त्याची कंपनी सॉफ्ट ड्रिक्स आणि मिठाई तयार करते. या प्रकल्पावर त्याने 1400 कोटी रुपये खर्च केले आहेत.