ख्यातनाम गिर्यारोहक निर्मल पुरजा यांचं निधन, पाकिस्तानातील पर्वतावर चढाई करताना दुर्दैवी अंत
ख्यातनाम नेपाळी गिर्यारोहक निर्मल पुरजा यांच्या निधानाच्या बातमीने हळहळ व्यक्त होत आहे. पाकिस्तानातील ब्रॉड पीकवर हिमस्खलनात त्यांचा दु्र्दैवी मृत्यू झाला. दहा सदस्यीय टीमचं नेतृत्व करत या पर्वतावर चढाई करताना हा अपघात झाला.

जगभरात निम्स दाई म्हणून ख्याती असलेले नेपाळी गिर्यारोहक निर्मल पुरजा यांनी जगाचा निरोप घेतला आहे. पाकिस्तानातील ब्रॉड पीकवर चढाई करताना हिमस्खलनात 30 जुलै 2026 रोजी बेपत्ता झाले होते. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. (Photo: Nirmal Purja MBE Twitter)

निर्मल पुरजा यांच्या मालकीच्या 'एलीट एक्सपेड' या ट्रेकिंग कंपनीने सोशल मीडियावरून त्यांच्या निधनाच्या बातमीला अधिकृत दुजोरा दिला आहे.कंपनीने सांगितले की, हिमस्खलनात निम्सचा मृत्यू झाला. इतकंच काय तर या मोहिमेत निर्मल पुरजा यांच्यासह त्यांच्या टीममधील सर्व 10 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. (Photo: Nirmal Purja MBE Twitter)

निर्मल पुरजा हे जगातील 8 हजार मीटरपेक्षा जास्त उंच असलेल्या सर्व 14 सर्वोच्च शिखरांवर सलग तिसऱ्यांदा चढाई करून 'हॅटट्रिक'चा एक नवा जागतिक विक्रम रचण्यासाठी सज्ज झाले होते. पण ही मोहिम यशस्वी होण्यापूर्वीच त्याचं निधन झालं. गुरुवारी हिमस्खलन झाले, तेव्हा संघ कॅम्प 2 वरून कॅम्प 3 कडे जात होता. या घटनेनंतर लगेचच संघाशी संपर्क पूर्णपणे तुटला. (Photo: Nirmal Purja MBE Twitter)

नेपाळचे रहिवासी असलेले आणि नंतर ब्रिटिश नागरिकत्व घेतलेले 43 वर्षीय निर्मल पुरजा हे गिर्यारोहण क्षेत्रातील 'सुपरहीरो' म्हणून गणले जात होते. त्यांनी 2019 मध्ये अवघ्या 189 दिवसांत जगातील सर्व 14 सर्वोच्च शिखरे सर करून इतिहास रचला होता. त्यावर '14 Peaks: Nothing Is Impossible' ही प्रसिद्ध नेटफ्लिक्स डॉक्युमेंट्री देखील आहे. (Photo: Nirmal Purja MBE Twitter)

पाकिस्तानच्या अल्पाइन क्लबनुसार , दहा सदस्यीय आंतरराष्ट्रीय संघात निम्सच्या नेतृत्वाखालील पाच नेपाळी गिर्यारोहकांचा समावेश होता. उर्वरित सदस्यांमध्ये पाकिस्तान, ओमान, अमेरिका आणि चीन येथील प्रत्येकी एक गिर्यारोहक आणि आणखी एका आंतरराष्ट्रीय सदस्याचा समावेश होता. (Photo: Nirmal Purja MBE Twitter)