
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं यजमानपद अमेरिका, कॅनडा आणि मॅक्सिकोकडे आहे. ही स्पर्धा 11 जून ते 19 जुलै 2026 पर्यंत असून एकूण 48 संघ भाग घेणार आहेत. यात इराणी संघाचा समावेशही आहे. 12 गट केले असून प्रत्येक गटात 4 संघ आहेत. इराणने या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली असून जी गटात आहे. या गटात बेल्जियम, इजिप्त आणि न्यूझीलंडचा संघ आहे. सध्या अमेरिका-इस्राईल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे. त्यामुळे इराणचा संघ अमेरिकेत स्पर्धेसाठी जाणार का? असा प्रश्न आहे. असं असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी फुटबॉल संघाला डिवचलं होतं. आपला जीव आणि सुरक्षेसाठी त्यांनी फिफा वर्ल्डकप स्पर्धेत भाग घेऊ नये, असं ट्रम्प म्हणाले. याला इराणी फुटबॉल संघाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. इराणी फुटबाल संघाने सांगितलं की, कोणताही देश त्यांना वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी होण्यापासून रोखू शकत नाही. कारण ही स्पर्धा कोणताही देश नव्हे तर फिफा आयोजित करतो.
इराणच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाने अधिकृत सोशल मिडिया खात्यावरून स्पष्ट केलं की, ‘या स्पर्धेतून कोणीही इराणला वगळू शकत नाही. अमेरिकेकडे यजमानपद आहे. ते जर सहभागी संघांची सुरक्षा निश्चित करू शकत नसतील तर त्यांना जबाबदार धरलं पाहीजे. विश्वचषक हा एक ऐतिहासिक आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. त्याची प्रशासकीय संस्था ही फिफा आहे. कोणताही देश नाही. इराणच्या शूर पुत्रांची ताकद असलेला इराणी राष्ट्रीय संघ या प्रमुख स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या पहिल्या संघांपैकी एक होता. विश्वचषकातून कोणीही इराणी राष्ट्रीय संघाला वगळू शकत नाही. वगळता येणारा एकमेव देश म्हणजे यजमान आहे. कारण सहभागी संघांना सुरक्षा प्रदान करण्याची क्षमता नाही’
इराणने मागच्या वर्षी आशियाई पात्रता फेरीच्या तिसऱ्या फेरीत ग्रुप अ मध्ये अव्वल स्थान मिळवून सलग चौथ्या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. इराण फिफा वर्ल्डकप स्पर्धेत अमेरिकेत तीन सामने खेळणार आहे. यात चांगली कामगिरी केली. तर पुढच्या फेरीसाठी पात्र ठरतील. असं असताना फिफा अध्यक्ष जियानेी इन्फॅटिनो यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीनंतर इन्फँटिनो म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. त्याने आश्वासन दिलं आहे की 2026 वर्ल्डकप स्पर्धेसाठी सहभागी इराण संघाचं स्वागत करतील.