केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय, भारतीय कुस्ती महासंघावरील निलंबन मागे, झालं असं की..

भारतीय कुस्ती महासंघ आणि वाद गेल्या काही दिवसांपासून सुरु होता. त्यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्रालय याबाबत काय निर्णय घेते याकडे लक्ष लागून होतं. अखेर क्रीडामंत्रालयाने महासंघावर लादलेलं निलंबन मागे घेतलं आहे.

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय, भारतीय कुस्ती महासंघावरील निलंबन मागे, झालं असं की..
कुस्ती महासंघ
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 11, 2025 | 8:21 PM

केंद्रीय क्रीडा मंत्रालय कुस्ती महासंघाबाबत काय निर्णय घेतं याकडे लक्ष लागून होतं.  अखेर क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघावरील निर्बंध हटवले आहेत. या निर्णयामुळे देशांतर्गत स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी राष्ट्रीय संघाची निवड करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. यात अम्मान येथे होणाऱ्या आशियाई चॅम्पियनशिपसाठी ट्रायलही सहभागी आहे. 15 महिन्यांपूर्वी क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघावर निर्बंध लादले होते. त्याचं कारण असं होतं की, 24 डिसेंबर 2023 रोजी अंडर 15 आणि अंडर 20 राष्ट्रीय स्पर्धेची घाईघाईने घोषणा केली होती. त्यानंतर क्रीडा मंत्रालयाने कारवाई केली होती. 21 डिसेंबर 2023 रोजी पार पडलेल्या निवडणुकीत संजय सिंह यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने विजय मिळवला होता. त्यानंतर तीन दिवसांनी लगेचच ब्रिजभूषण शरण सिंह यांचा गड असलेल्या गोंडाच्या नंदिनी नगर येथे नॅशनल चॅम्पियनशिपसाठी ठिकाण निवडलं होतं. त्यामुळे बराच वाद झाला होता. अखेर सरकारने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली, तसेच क्रीडा मंत्रालयाने निर्बंध लादले होते. पण 15 महिन्यांचा निर्बंधानंतर कुस्ती महासंघाचं निलंबन मागे घेतले आहेत. सुधारणात्मक बद केल्यानंतर निलंबन मागे घेतल्याचं क्रीडा मंत्रालयाने आदेशात म्हंटलं आहे.

क्रीडामंत्रालयाच्या कारवाईमुळे आणि कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पूनिया आणि सत्यव्रत कादियान यांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे भारतीय कुस्तीपटूंना जाग्रेब आमि अल्बानियात रॅकिंग सीरिज स्पर्धेत भाग घेता आला नाही. आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेचं आयोजन 25 मार्चपासून जॉर्डन येथे होणार आहे. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष संजय सिंह यांनी क्रीडामंत्रालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. ‘मी या निर्णयासाठी क्रीडामंत्रालयाचे आभार मानतो. आता दिलेल्या सूचनांनुसार काम करणार आहोत. खेळासाठी हे खूपच आवश्यक आहे. दुसरीकडे, निर्बंधामुळे खेळाडू स्पर्धेत भाग घेऊ शकत नव्हते.’

न्यायालयाने भारतीय ऑलिंपिक असोसिएशनला कुस्ती महासंघाचे कामकाज हाताळण्यासाठी एड-हॉक पॅनेल पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. पण देशाच्या सर्वोच्च क्रीडा संस्थेने नकार दिला होता. कारण यूडब्ल्यूडब्ल्यू फक्त भारतीय कुस्ती महासंघाला मान्यता देते आणि एड-हॉक पॅनेलमधील नोंदी स्वीकारणार नाही.