कोल्हापूरच्या स्वप्नीलने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलं, पण वडिलांच्या धाडसी निर्णयाची अशीही दुसरी बाजू

Who is Swapnil Kusale : स्वप्नील कोल्हापुरच्या राधानगरीतल्या कांबळवाडी गावचा. 2009 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षापासून स्वप्नीलने नेमबाजीचा सराव सुरु केला. स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे हे पेशाने शिक्षक. आई अनिता गावच्या सरपंच आहेत.

कोल्हापूरच्या स्वप्नीलने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलं, पण वडिलांच्या धाडसी निर्णयाची अशीही दुसरी बाजू
Swapnil Kusale
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 01, 2024 | 3:46 PM

महाराष्ट्राच्या मुलाने पॅरिसमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत कमाल केली आहे. कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. त्याने भारतासाठी पदक विजेती कामगिरी केली आहे. स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरं पदक मिळवून दिलं आहे. त्याने कांस्य पदकावर निशाणा साधला. स्वप्नीलने 50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकार 1 मध्ये ब्राँझ पदक विजेती कामगिरी केली. स्वप्नील कुसाळे खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक विजेती कामगिरी करणारा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू आहे.

कोल्हापूर ते पॅरिस हा स्वप्नील कुसाळे याचा ऑलिम्पिक प्रवास सोपा नव्हता. अनेक अडथळ्यांची शर्यत त्याने पार केली. स्वप्नीलने नाशिकच्या क्रीडा प्रबोधिनीतून नेमबाजीचे प्राथमिक धडे गिरवले. स्वप्नील कोल्हापूरच्या राधानगरीतल्या कांबळवाडी गावचा. 2009 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षापासून स्वप्नीलने नेमबाजीचा सराव सुरु केला. स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे हे पेशाने शिक्षक. आई अनिता गावच्या सरपंच आहेत. स्वप्नील पुण्यात रेल्वेच्या सेवेत आहे. मागच्या 10-12 वर्षात स्वप्नील कुसाळेने ज्यूनियर आणि सीनियर स्तरावर छाप उमटवली.

नेमबाजीत सर्वाधिक खर्च कशावर?

स्वप्नील कुसाळेने आज नेमबाजीत पदक मिळवल्याने त्याच यश दिसतय. पण हा प्रवास सोपा नव्हता. नेमबाजीचा खेळ खर्चिक आहे. जॅकेट, गन, बुलेट यासाठी बराच पैसा लागतो. नेमबाजीच्या खेळात एकाग्रता जशी महत्त्वाची तितकाच सरावही आवश्यक असतो. ऑलिम्पिकपर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. या खेळात सर्वाधिक खर्च येतो तो गोळ्यांवर म्हणजे बुलटेवर.

एका बुलेटची किंमत किती?

स्वप्नीलच्या आजच्या यशाच श्रेय जातं ते त्याचे वडील सुरेश कुसाळे यांना. एकवेळ मुलाच्या सरावात कुठला खंड पडू नये, यासाठी त्यांना बँकेकडून कर्ज घ्याव लागलं. वडिलांनी बँकेकडून कर्ज काढून मुलाला बुलेटसाठी पैसे दिले. त्यावेळी एका बुलेटची किंमत 120 रुपयाच्या घरात होती. त्यामुळे स्वप्नील कुसाळेच्या आजच्या यशाच श्रेय त्याच्या आई-वडिलांचही तितकच आहे.