Rishabh Pant: ऋषभ पंतचं पुनरागमनला ‘ग्रहण’, न्यूझीलंडविरुद्ध कसोटी सामना खेळणारच होता पण तेवढ्यात…
IND vs NZ Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या सामन्यांची मालिकेपूर्वी आता ऋषभ पंतबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Rishabh Pant IND vs NZ Test: भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमुळे त्रस्त असून न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तो अद्याप तंदुरुस्त होऊ शकलेला नाही. पंतने तंदुरुस्ती चाचणी दिली आहे, परंतु त्याला प्रवासासाठी परवानगी मिळालेली नाही. पंत गेल्या १० दिवसांपासून बंगळूरु येथील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आहे. रविवारी तो तंदुरुस्ती चाचणीत अपयशी ठरला. आता त्याला आपली तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी आणखी एक संधी दिली जाईल. जर तो या चाचणीत यशस्वी झाला, तर तो दोन कसोटी सामन्यांसाठी न्यूझीलंडला जाऊ शकतो.
इराणी चषकात ‘रेस्ट ऑफ इंडिया’चे कर्णधारपद भूषवताना पंतला दुखापत झाली होती. त्याच्या बरगडीला ताण आला होता. क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, न्यूझीलंडला जाण्यापूर्वी पंतला आणखी एक तंदुरुस्ती चाचणी द्यावी लागेल. या चाचणीनंतरच तो तंदुरुस्त आहे की नाही हे कळेल. जर तो तंदुरुस्त असेल, तर तो ७ नोव्हेंबरपासून लिंकन येथे सुरू होणाऱ्या न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्धच्या तिसऱ्या बहुदिवसीय सामन्यासाठी भारत ‘अ’ संघात सामील होऊ शकतो.
पंतचा भारत ‘अ’ संघात आधीच समावेश होता. न्यूझीलंड दौऱ्यावर संघ तीन चार-दिवसीय सामने खेळणार होता. भारत दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर भारत ‘अ’ संघाचे हे सामने महत्त्वपूर्ण आहेत. या मालिकेत पंतचा सहभाग आधीच तंदुरुस्तीच्या मंजुरीवर अवलंबून होता. दुखापतीतून सावरत असल्यामुळे तो पहिले दोन सामने खेळू शकला नाही. त्याच्या जागी कुमार कुशाग्रला संघात स्थान देण्यात आले आहे. ध्रुव जुरेलच्या उपस्थितीमुळे कुमार कुशाग्रला अद्याप खेळण्याची संधी मिळालेली नाही.
न्यूझीलंडमधील कसोटी मालिका १९ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी पंतची निवड झाली आहे. दरम्यान, अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह तंदुरुस्ती चाचणीत उत्तीर्ण होऊन न्यूझीलंडला रवाना झाला आहे. तो न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्धच्या तिसऱ्या बहुदिवसीय सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत खेळू शकला नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठीच्या संघातही त्याचा समावेश नव्हता.