
तेंडल्या… अर्थात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज 52 वर्षाचा झालाय. 16 वर्ष आणि 205 दिवसाचा असताना सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकलं होतं. त्यानंतर सचिनने कधीच मागे वळून पाहिलं नाही. तब्बल 24 वर्ष सचिन देशासाठी खेळला. या 24 वर्षात विक्रमांना गवसणी घालतानाच त्याने जगभरातील क्रिकेटप्रेमींचं मनोरंजनही केलं. आपल्या अद्भभूत प्रवासात त्याने अनेक विक्रम रचले. त्यामुळेच सचिनला क्रिकेटचा देव म्हटलं जातं. सचिनची ही कामगिरी पाहूनच त्याला देशाचा सर्वोच्च असा भारत रत्न पुरस्कार देऊनही गौरवण्यात आलं होतं.
सचिनने त्याच्या काळातील बड्या बड्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं होतं. सचिनला आऊट करणं ही गोलंदाजांसमोरची टास्क असायची. सामना सुरू होण्यापूर्वी सचिनला बाद कसं करायचं याचं प्लानिंग केलं जायचं. त्यानंतरच विरोधी टीम मैदानात उतरायची आणि सचिन कधी आऊट होतोय याची वाट पाहायची. सचिन हा जगातील सर्वोत्तम फलंदाज असला तरी त्याला गोलंदाज व्हायचं होतं हे तुम्हाला माहीत आहे का?
अन् गोलंदाजाचा फलंदाज झाला
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू डेनिस लिली यांच्या सल्ल्यानंतर सचिनने गोलंदाज बनण्याचा नाद सोडला. त्याने थेट बॅटिंगवर फोकस केला. एका सामन्यात तर सचिनने बाउंसर टाकला होता. त्यामुळे फलंदाजाचं नाक तुटलं होतं. 20 एप्रिल 1991मध्ये दिल्ली आणि मुंबईत रणजी सामना होता. त्यावेळी हा किस्सा घडला होता.
नाकातून रक्तच वाहू लागलं…
दिल्लीच्या दुसऱ्या डावाच्यावेळी सचिनचा शॉर्ट पिच चेंडू फलंदाज बंटू सिंह याला लागला. बंटू हा 1980 आणि 1990 च्या दशकात दिल्लीच्या फलंदाजीचा आधार स्तंभ होता. सचिनने त्याला टाकलेला चेंडू इतका खतरनाक होता की त्याच्या नाकातून रक्त वाहू लागलं. बंटूला तात्काळ कोटलाच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे गेल्यावर बंटूच्या नाकाला अनेक फ्रॅक्चर झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे त्याच्या नाकाची सर्जरी करण्यता आली. बंटूला कमीत कमी दोन महिने फक्त पातळ पदार्थावरच राहावं लागलं होतं.
नाकाचा नकाक्षाच बदलला
या घटनेवर बंटू सिंह म्हणतात. माझ्या नाकाचा नकाशाच बदलला. सचिनच्या त्या बाउंसर नंतर माझ्याकडे नवीन नाक आहे. त्या मॅचसाठी आम्ही कोटलाची घसरणारी पीच तयार केली होती. वेगवागन गोलंदाजांना उसळी मिळेल यासाठीची ही तयारी होती. पण नंतर ही पीच फलंदाजांसाठी स्वर्ग ठरली. आमचा वेगवान गोलंदाज संजीव शर्मा आणि अतुल वासनने दिलीप वेंगसरकरला काही बाउंसर टाकले होते. मला आठवतंय, कमीत कमी दोनवेळा अतुलचे शॉर्ट पीचचे चेंडू दिलीपच्या छातीवर आदळले होते.
नाक तर ठिक आहे ना तुझं?
मॅच संपल्यानंतर मुंबई टीम त्याच दिवशी निघून गेली होती. रात्री 11 वाजता आमचा लँडलाईन फोन वाजला. माझ्या वडिलांनी फोन घेतला. तो फोन सचिनने केला होता. त्याने माझा नंबर कुठून शोधून काढला माहीत नाही. माझी तब्येत कशी आहे? डॉक्टरांनी काय सांगितलं? याची चौकशी सचिनने केली. नंतर आम्ही जेव्हाही भेटायचो तेव्हा तुझं नाक तर ठिक आहे ना? असं तो मला चिडवायचा, असंही बंटू यांनी सांगितलं.