Sunil Gavaskar : हरल्यानंतर पीचला नाव ठेवणाऱ्यांचं सुनील गावस्करांनी तोंड केलं बंद, पटण्यासारख एकदम तर्कसंगत विश्लेषण
Sunil Gavaskar : टीम इंडियाचा काल वेस्ट इंडिजकडून पराभव झाला. या पराभवामुळे सीरीजमध्ये वेस्ट इंडिजने 2-2 अशी बरोबरी साधली आहे. हार झाल्यानंतर अनेकजण आता पीचला दोष देत आहेत. सामन्यानंतर सुनील गावस्कर यांनी अचूक विश्लेषण केलं आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध चौथ्या टी20 सामन्यात टीम इंडियाचा 24 धावांनी पराभव झाला. भारतीय गोलंदाजांनी खूप सुमार दर्जाची गोलंदाजी केली. त्यामुळे वेस्ट इंडिजच्या टीमने 247 धावा कुटल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया 223 धावांपर्यंत पोहोचली. या प्रदर्शनामुळे टीम इंडियाच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालय. या पराभवानंतर पीच बद्दल चर्चा सुरु झाली आहे. टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी गोलंदाजांच्या चूका दाखवत पीचचं कारण फेटाळून लावलं. ‘खराब गोलंदाजीसाठी पीचला दोष देणं योग्य नाही’ असं सुनील गावस्कर म्हणाले. हैदराबादच्या पीचपेक्षा पण भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीची चिंता वाटली पाहिजे. गोलंदाजांनी अनेकदा चुकीच्या टप्प्यावर गोलंदाजी केली. त्याचा फलंदाजांनी पुरेपूर फायदा उचलला असं सुनील गावस्कर यांनी सांगितलं. तिलक वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी पीचवर असताना वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी सुद्धा फुलटॉस चेंडू टाकले होते. पण नंतर मात्र त्यांनी आपली गोलंदाजी सुधारली. चूका टाळल्या असं गावस्कर म्हणाले.
“आपण जास्त पीच बद्दल बोलतो. पीचला दोष देतो की ते गोलंदाजांना अनुकूल नाहीत. पण तुम्ही फुलटॉस गोलंदाजी केली, तर त्याच पीचचा काय दोष?” असा प्रश्न गावस्कारांनी विचारला. ‘वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी अचूक टप्पा आणि दिशा ठेवून गोलंदाजी केली, यॉर्कर टाकले तेव्हा त्यांना यश मिळालं’ असं सुनील गावस्कर म्हणाले. गोलंदाजांनी परिस्थितीचं कारण देण्याऐवजी आपल्या गोलंदाजीत सुधारणा केली पाहिजे हे गावस्करांच्या टिप्पणीवरुन स्पष्ट होतं.
पिस काढत मर्यादा दाखवून दिली
हैदराबादमध्ये चौथा टी 20 सामना झाला. वेस्ट इंडिजची टीम टॉस हरली. त्यांनी तीन विकेट गमावून 247 धावांचा डोंगर उभारला. शाई होपने स्फोटक नाबाद 102 धावा केल्या. शिमरॉन हेटमायरने फक्त 12 चेंडूत 33 धावा करुन भारतीय गोलंदाजांवरील दबाव वाढवला. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची पिस काढत मर्यादा दाखवून दिली. टीमला एका मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवलं.
आपल्या रणनितीमध्ये बदल केला
भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितलं की, सामन्यादरम्यान खेळपट्टी थोडी धीमी झाली होती. चेंडूंना अतिरिक्त उसळी मिळत होती. पण त्याने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचं कौतुक केलं. परिस्थिती आण फिल्डच्या हिशोबाने त्यांनी आपल्या रणनितीमध्ये बदल केला.