Sunil Gavaskar : ‘त्यांचं मैदानावर येणं आधी बंद करा’, आयपीएल सामन्यातील रोजचं एकच दृश्य पाहून गावस्करांचा संताप, सरळ सुनावलं

Sunil Gavaskar : सुनील गावस्कर हे उत्तम समालोचक आहेतच. पण ते स्पष्टवक्ते सुद्धा आहेत. कॉमेंट्री करताना सुनील गावस्कर आपली मतं परखडपणे मांडत असतात. जे खटकत ते गावस्कर बोलून दाखवतात. सध्या सुरु असलेल्या आयपीएल सीजनमधील अशीच एक गोष्ट त्यांना खटकली, ती त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवली.

Sunil Gavaskar : त्यांचं मैदानावर येणं आधी बंद करा, आयपीएल सामन्यातील रोजचं एकच दृश्य पाहून गावस्करांचा संताप, सरळ सुनावलं
Sunil Gavaskar
| Updated on: Apr 28, 2026 | 10:41 AM

इंडियन प्रीमियर लीगमध्ये रोमांचक सामन्यांचा सिलसिला सुरु आहे. काही सामने अटी-तटीचे होत आहेत, तर काही सामन्यात रेकॉर्ड मोडले जात आहेत. आयपीएल ही प्रेक्षकांना एंटरटेन करणारी टी 20 लीग म्हणून क्रिकेट विश्वात लोकप्रिय आहे. त्याच लौकीकानुसार आयपीएलचे सामने सुरु आहेत. वैभव सूर्यवंशी ते प्रभसिमरन सिंह पर्यंत युवा खेळाडू बेधडकपणे आक्रमक क्रिकेट खेळत आहेत. आपल्या खेळाने त्यांनी प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. पण या आयपीएल सामन्यात एक गोष्ट प्रेक्षकांना खटकतेय ती म्हणजे सामन्यांची लांबी. त्यामुळे इंटरेस्ट थोडा कमी होत चालला आहे. टी 20 क्रिकेटची रचनाच मूळात तीन तासात सामना आटोपण्यासाठी झाली आहे. पण सध्या सुरु असलेले आयपीएल सामने चार तासापेक्षा जास्त वेळ चालत आहेत. चाहत्यांच्या संयमाची जणू परीक्षाच सुरु आहे.

सामन्यातला हा वेळकाढूपणा संपवण्यासाठी बीसीसीआयने दंडाची कारवाई केली. कर्णधारावर एक-दोन सामन्यांची बंदी घालणं, स्लो ओव्हर रेटसाठी दंड अशा प्रकारची कारवाई सुरु आहे. पण तरीही समस्या अजूनही कायम आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्स हा यंदाच्या सीजनमधील सर्वाधिक वेळ चाललेला सामना आहे. 4 तास 22 मिनिटं हा सामना सुरु होता. सामन्यातील हा वेळकाढूपणा संपवण्यासाठी भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी बीसीसीआयला एक विनंती केली आहे. “सपोर्ट स्टाफ आणि राखीव खेळाडूंचा मैदानावरील प्रवेश बंद करा आणि खेळाच्या जागेची पवित्रता राखा” असा सल्ला सुनील गावस्कर यांनी दिला आहे.

हे सवलतीचा गैरफायदा घेणं आहे

“राखीव प्लेयर उगाचच सीमारेषेवर उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाला पाण्याची बॉटल देण्यासाठी येतात. त्यांना परवानगी देऊ नये. स्ट्रॅटजिक टाइम आऊटमध्ये बरेच लोक मैदानात असतात. हे सवलतीचा गैरफायदा घेणं आहे. ड्रिंक्स घेऊन येणारे दोन राखीव खेळाडू आणि कोचिंग स्टाफचे दोन सदस्य यांच्याशिवाय मैदानात यायला कोणालाही परवानगी देऊ नये” असं सुनील गावस्कर यांनी मिड-डे मधल्या आपल्या स्तंभात लिहिलं आहे.

कृपया खेळाच्या जागेची पवित्रता कायम ठेवा

“रिची बेनो यांनी मला माझ्या ब्रॉडकास्टिंग करियरच्या सुरुवातीला एक गोष्ट सांगितलेली की, मैदान एक पवित्र जागा आहे. तिथे खेळाडू आणि अंपायरशिवाय अजून कोणी असू नये. त्यामुळेच मी पीच रिपोर्ट किंवा टीव्ही शो करत नसेन, तर क्वचितच मैदानावर जातो. ऑल-एक्सेस एक्रेडिटेशन वाले कमेटी मेंबर बाउंड्री पार जाणार नाहीत हे बीसीसीआय सुनिश्चित करेल अशी मला अपेक्षा आहे. कृपया खेळाच्या जागेची पवित्रता कायम ठेवा” असं सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे.

Follow Us