
नव्या वर्षात भारतीय टीमची पहिली इंटरनॅशनल सीरीज न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. टी 20 वर्ल्ड कप आधी न्यूझीलंडची टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. 11 जानेवारीपासून या सीरीजला सुरुवात होणार आहे. दोन्ही टीम आधी वनडे सीरीज खेळणार आहेत. त्यासाठी आज 3 जानेवारीला भारतीय संघाची घोषणा होणार आहे. सध्याच्या स्थितीत ही सीरीज आणि त्यासाठी होणाऱ्या टीम घोषणेला फार महत्व नाहीय. पण काही खेळाडूंसाठी ही घोषणा म्हणजे त्यांचं भविष्य काय असेल, ते स्पष्ट होईल. यात एक मोठ नाव म्हणजे मोहम्मद शमी. शमीचा टीम इंडियात समावेश होईल का?.
शनिवारी चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील सिलेक्शन कमिटी ऑनलाइन मीटिंग करुन 3 सामन्यांच्या वनडे सीरीजसाठी स्क्वॉड निवडणार आहे. याची घोषणा बीसीसीआयच्या सोशल मिडिया आणि वेबसाइटवर होईल. या सीरीजशी संबंधित काही महत्वाच्या बातम्या आधीच समोर आल्या आहेत. ऋषभ पंतला ड्रॉप केलं जाऊ शकतं. हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती दिली जाई. जेणेकरुन ते टी 20 वर्ल्ड कपसाठी फिट राहतील.
दोघांचे परस्परांवर आरोप
या सगळ्यामध्ये मोहम्मद शमीच्या टीम इंडियातील पुनरागमनाच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. मागच्यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीपासून मोहम्मद शमी टीमच्या बाहेर आहे. या दरम्यान त्याचा फिटनेस आणि फॉर्म यावर सातत्याने संशय व्यक्त झाला. यावरुन चीफ सिलेक्टर अजित आगरकर आणि त्याच्यात शाब्दीक द्वंद सुद्धा रंगलं.दोघांनी परस्परांवर आरोप केले. आगरकर शमीच्या फिटनेसबद्दल प्रश्न उपस्थित करत होते, तर दुसऱ्याबाजूला शमी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळून त्यांना उत्तर देत होता.
देशातंर्गत क्रिकेटमध्ये त्याचं प्रदर्शन कसं?
यावेळी स्थिती मोहम्मद शमीसाठी अनुकूल दिसतेय. शमी मागच्या 3-4 महिन्यांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये सक्रीय असून दमदार प्रदर्शन करतोय. शमीने रणजी सीजनच्या पहिल्या टप्प्यात सात इनिंग्समध्ये 18.60 च्या सरासरीने 20 विकेट काढले आहेत. त्यानंतर सैयद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीमध्ये 7 सामन्यात 16 विकेट काढले. इथे तो थोडा महागडा ठरला. पण त्याला सूर सापडलेला आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळताना त्याने 4 सामन्यात 8 विकेट काढलेत. तो प्रभावी दिसून येतोय. मोहम्मद शमीने त्याच्या बाजूने फॉर्म आणि फिटनेस दोन्ही सिद्ध केला आहे. म्हणूनच यावेळी शमीकडे दुर्लक्ष करण्यासाठी आगरकर यांच्या कमिटीकडे काही कारण नाहीय. शमीच्या बाजूला जाणारी अजून एक गोष्ट म्हणजे आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने महत्वाच्या गोलंदाजाला विश्रांती देण्यात येणार आहे. त्यामुळे त्याच्याजागी शमीची निवड करायला हरकत नाही.