Ajit Agarkar : …तर अजित आगरकर भारताचा कॅप्टन झाला असता, मुंबईचा दिग्गज क्रिकेटपटू असं का म्हणाला?
Ajit Agarkar : निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर सध्या टीकाकारांच्या रडारवर आहेत. चहूबाजूंनी त्यांच्यावर टीका सुरु आहे. या अशा परिस्थितीत मुंबई टीममधून त्यांच्यासोबत खेळलेल्या एका दिग्गज क्रिकेटपटूने अजित आगरकर यांच्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यातून त्यांची क्षमता लक्षात येते.

सध्या भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर टीकाकारांच्या रडारवर आहेत. खासकरुन विराटच्या शतकी खेळीनंतर अजित आगरकर यांच्यावर होणाऱ्या टीकेची धार वाढली आहे. निवड समितीचे अध्यक्ष म्हणून अजित आगरकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. पण अजित आगरकर स्वत: क्रिकेट खेळायचे, त्यावेळी त्यांची विचारक्षमता, नेतृत्व गुण कसे होते? याबद्दल मुंबईच्या रणजी संघातील त्यांचे माजी सहकारी सुलक्षण कुलकर्णी यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. “मी माझ्या आयुष्यात बघितलेले दोन बेस्ट कॅप्टन म्हणजे एक अजित आगरकर आणि दुसरा रवी शास्त्री” असं सुलक्षण कुलकर्णी म्हणाले.
“अजित आगरकर 15 वर्ष इंटरनॅशनल क्रिकेट खेळला. पण त्याने 5-6 वर्ष तरी मुंबई लीड करायला पाहिजे होती, असं वाटलं. कदाचित तो भारताचा कॅप्टन बनू शकला असता, इतके उत्तम नेतृत्व गुण त्याच्यामध्ये होते” असं सुलक्षण कुलकर्णी म्हणाले. “तसचं मला आवडलेला आणखी एक कॅप्टन म्हणजे रवी शास्त्री. आपल्याला काय पाहिजे या बद्दल रवी शास्त्रींचा विचार क्लियर होता. ते त्या बद्दल ठाम असायचे. सर्वांना सोबत घेऊनही चालायचे आणि निवड समितीच्या पदाधिकाऱ्यांनाही सांगायचे मला कशा प्रकारची टीम हवी. नेमकं काय पाहिजे याबद्दल रवी शास्त्रींकडे स्पष्टता होती. तो गुण मला त्यांचा भावला” असं सुलक्षण कुलकर्णी म्हणाले. स्पोर्ट्स कट्टाला दिलेल्या मुलाखतीत सुलक्षण कुलकर्णी यांनी हे बारकावे सांगितले.
त्यामुळे तो बॉलर्स कॅप्टन होता
“टेस्टमध्ये 90 ओव्हर टाकाव्या लागतात. एका बॉलरचा 18 ते 20 ओव्हरचा स्पेल असतो. तीन ते चार स्पेल टाकावे लागतात. प्रत्येक स्पेल चांगला जाईलच असं नाही. त्यावेळी गोलंदाजाच्या पाठीशी उभं राहणारा तो कॅप्टन होता. त्याला बॅक करायचा. महत्वाचं म्हणजे संकट स्थिती असताना अजित स्वत: लीड घ्यायचा. बॉलिंगला यायचा आणि विकेट मिळवून द्यायचा किंवा बाऊन्सर वैगेर अशा प्रकारची गोलंदाजी करायचा. त्यामुळे तो बॉलर्स कॅप्टन होता. अजितने पाच-सहा वर्ष मुंबईच नेतृत्व केलं असतं, तर तो कदाचित देशाचा कॅप्टन बनू शकला असता” असं सुलक्षण कुलकर्णी म्हणाले. सुलक्षण कुलकर्णी हे माजी क्रिकेटपटू आहेत. त्यांनी रणजीमध्ये मुंबईच प्रतिनिधीत्व केलय.
