झाडावरून पडला, गमावला हात..; राज ठाकरेंच्या भेटीसाठी अडीच तास थांबला, तो गोल्ड मेडलिस्ट आहे तरी कोण?
2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारे पॅरा अॅथलीट दिलीप गावित यांना गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना भेटता आले नाही.

2026 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारे पॅरा अॅथलीट दिलीप गावित यांना गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना भेटता आले नाही. गवीत यांचे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांनी दावा केला की, आमंत्रण मिळूनही दोघांनी सुमारे दोन तास वाट पाहिली, पण ही भेट होऊ शकली नाही. राज ठाकरे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत आणि दिलीप गवीत यांना त्यांना भेटण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, वेळेवर पोहोचूनही त्यांना बराच वेळ वाट पाहावी लागली.” भेट न झाल्याने ते दोघेही निघून गेले. तर या वर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली की त्यांना या संदर्भात काहीच माहित नव्हतं. भारतासाठी सुवर्णपदक जिंकलेला दिलीप गावित नेमका आहे तरी कोण याबद्दल जाणून घ्या…
पॅरा धावपटू दिलीप महाडू गावितचे आयुष्य संघर्षाने भरलेल आहे. महाराष्ट्रातील नाशिकजवळच्या तोरण डोंगरी या छोट्या गावात जन्मलेले गावित, वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी झाडावरून पडून त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. वेळेवर आणि योग्य उपचार न मिळाल्याने, जखमेला गँगरीन झाले आणि डॉक्टरांना त्याचा उजवा हात कोपराच्या खाली कापावा लागला. शेतकरी कुटुंबातील असल्याने, हा गावित आणि त्याच्या कुटुंबासाठी एक मोठा धक्का होता, पण त्याने याला आपली कमजोरी बनू दिले नाही.
गावात खेळाच्या सुविधांचा अभाव असूनही, त्याने धावायला सुरुवात केली. त्याची प्रतिभा सर्वप्रथम प्रशिक्षक वैजयंत काळे यांच्या लक्षात आली. काळे म्हणाले, “मी त्याला शाळेत पाहिले आणि त्याच्या पालकांना त्याला प्रशिक्षण घेऊ देण्यासाठी राजी केले. त्याला पॅरा खेळांबद्दल काहीही माहिती नव्हती. सामान्य खेळाडूंच्या स्पर्धांमध्ये भाग घेतानाही तो चांगली कामगिरी करत होता.” पॅरा ॲथलेटिक्समध्ये प्रवेश करण्यापूर्वीच गावित याने आपली प्रतिभा सिद्ध केली होती. त्याने खेलो इंडिया युवा गेम्समध्ये दोन आणि 18 वर्षांखालील गटात एक पदक जिंकले होते. नंतर, नाशिकमध्ये उत्तम प्रशिक्षण मिळाल्यानंतर, त्याच्या कारकिर्दीने नवीन उंची गाठली आणि आता त्याने राष्ट्रकुल खेळांच्या सर्वात मोठ्या मंचावर सुवर्णपदक जिंकून देशाला गौरव मिळवून दिला आहे.
सुवर्णपदक जिंकल्यानंतर गावित म्हणाला, “मी थोडी हळू सुरुवात केली, पण जसजशी शर्यत पुढे सरकली, तसतसा मी माझा वेग वाढवला आणि जिंकण्याचा तो एक अप्रतिम अनुभव होता. पावसात भिजलेल्या ट्रॅकवर धावणे सोपे नव्हते, पण त्याने या आव्हानाचे संधीत रूपांतर केले. माझे ध्येय अजून संपलेले नाही. मी सध्या नोकरीचा विचार करत नाहीये. माझे ध्येय पदक जिंकणे आहे. मला खात्री आहे की सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये जपानमध्ये होणाऱ्या पॅरा आशियाई खेळांमध्ये आणि त्यानंतर 2028 च्या लॉस एंजेलिस पॅरालिम्पिक्समध्ये मी आणखी चांगली कामगिरी करेन.”