भारताचा नवा तारा… वडिलांनी घराच्यामागे मैदान बनवलं; कोण आहे वैभव सूर्यवंशी?

वैभव सूर्यवंशी या 14 वर्षीय क्रिकेट खेळाडूने आयपीएलमध्ये पदार्पण करताच पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. त्याने केवळ 20 चेंडूत 34 धावा केल्या आणि 3 षटकार लगावले. राजस्थान रॉयल्स संघात सामील झालेल्या वैभवने आपल्या आक्रमक खेळीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

भारताचा नवा तारा... वडिलांनी घराच्यामागे मैदान बनवलं; कोण आहे वैभव सूर्यवंशी?
IPL 2025
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Apr 20, 2025 | 2:23 PM

Who is Vaibhav Suryavanshi : वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केलं. पदार्पणातच पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला… या दणकेबाज षटकारावर स्टेडियममध्ये टाळ्या आणि शिट्ट्या पडल्या नसत्या तर नवलंच… अख्खं स्टेडियम वैभव… वैभव… वैभव… च्या नावाने गुंजत होतं. भारतीय क्रिकेटला नवा तारा गवसल्याची ती हाळी होती. त्यानंतर तो थांबला नाही. गोलंदाजांची येथेच्छ धुलाई करत त्याने आक्रमक खेळी केली. त्याच्या या खेळीने सर्वांनाच भुरळ पाडली.

वैभव सूर्यवंशीला संघात राखीव खेळाडू म्हणून घेतलं. तोही संधीची वाट पाहत होता. त्याचं नशिब काल जोरावर होतं. कर्णधार संजू सॅमसनच जखमी झाला अन् 14 वर्ष 23 दिवसाच्या या मुलाला संघात स्थान मिळालं. त्यानेही हा विश्वास सार्थ ठरवला. पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून आपली संघात करण्यात आलेली निवड योग्यच होती हेही अधोरेखित केलं. राजस्थान रॉयल्सकडून तो खेळत होता. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये लखनऊ सुपर जाएंट्सच्या विरोधात बॅटिंग करताना त्याने सनसनाटी खेळी केली.

वैभवने मैदानात उतरताच षटकार ठोकला. त्यानंतर 20 चेंडूत 34 धावा बनवून तो बाद झाला. त्याने 2 चौकार आणि 3 षटकार लगावून आपली क्षमता दाखवून दिली. एडेन मार्करमच्या चेंडूवर ऋषभ पंतने त्याला यष्टीचित केलं. सूर्यवंशीला मेगा ऑक्शनच्यावेळी राजस्थान रॉयल्सने 1.10 कोटीला खरेदी करून संघात सामिल करून घेतलं होतं.

शादुर्ल आणि आवेशला धुतलं

वैभवने पहिल्याच ओव्हरमधील चौथ्या चेंडूवर भारताचा अनुभवी खेळाडू शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर छक्का मारला. आयपीएलच्या इतिहासातील तो पहिल्याच चेंडूला सामोरे जात होता. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये भारतासाठी खेळलेला आवेश खान गोलंदाजीला आला. वैभवने त्याचंही स्वागत षटकार लगावून केलं. वैभवने तिसरा षटकार आठव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मारला. यावेळी गोलंदाज होता दिग्वेश राठी.

कोण आहे वैभव सूर्यवंशी?

27 मार्च 2011 रोजी वैभवचा बिहारमध्ये जन्म झाला. सर्वात कमी वयात आयपीएलमध्ये स्थान मिळालेला तो खेळाडू आहे. त्याने जानेवारी 2024मध्ये बिहारसाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यावेळी त्याचं वय 12 वर्ष 284 दिवस होतं. त्याने डेब्यूच्यावेळी विजय हजारे ट्रॉफी 2024-25 मध्ये बडोदाच्या विरोधात 42 चेंडूत 71 धावा ठोकल्या होत्या. तो लिस्ट-ए मध्ये अर्धशतक ठोकणारा सर्वात कमी वयातील भारतीय खेळाडू आहे.

वडिलांनी घराबाहेर बनवलं मैदान

बिहारच्या समस्तीपूरच्या वैभवला चार वर्षाचा असल्यापासून क्रिकेट खेळण्याचं वेड लागलं होतं. त्याचे वडील संजीव यांनी त्याच्यासाठी घराच्या मागे एक ग्राऊंड तयार केलं होतं. त्याला वयाच्या नवव्या वर्षी समस्तीपूरच्या एका क्रिकेट अकादमीत दाखल केलं. त्यानंतर वैभवने मागे वळून पाहिलंच नाही. त्याने या मैदानातही वरिष्ठ गोलंदाजांची चांगलीच चंपी केली होती.

बीसीएकडून कौतुक

बिहार क्रिकेट असोसिएशन (बीसीए)चे अध्यक्ष अशोक तिवारी यांनी वैभवचं तोंडभरून कौतुक केलं आहे. वैभवला आयपीएलमध्ये धुवांधार बॅटिंग करताना पाहून मला प्रचंड आनंद झालाय. वैभवला जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा तो चांगली कामगिरी करेल हे मला नेहमी वाटत होतं. भविष्यातही तो चांगली कामगिरी करेल याची आशा आहे. ही तर केवळ सुरुवात आहे. मला वाटतं भविष्यातील भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठं नाव बनण्याची त्याची क्षमता आहे, असं अशोक तिवारी म्हणाले.