मिशन चंद्रयान 2: बाहुबली सज्ज, काऊंटडाऊन सुरु

| Updated on: Jul 13, 2019 | 5:34 PM

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (Indian Space Research Organisation, ISRO) मिशन चंद्रयान-2 (Mission Chandrayaan-2) चं काऊंट डाऊन रविवारी (14 जुलै) सुरु होईल. इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन (Dr K. Sivan) यांनी शनिवारी या मोहिमेची माहिती दिली. या मिशनचे काऊंट डाऊन 20 तासांचे असेल.

मिशन चंद्रयान 2: बाहुबली सज्ज, काऊंटडाऊन सुरु
Follow us on

Mission Chandrayaan-2 चेन्नई : भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (Indian Space Research Organisation, ISRO) मिशन चंद्रयान-2 (Mission Chandrayaan-2) चं काऊंटडाऊन रविवारी (14 जुलै) सुरु होईल. इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन (Dr K. Sivan) यांनी शनिवारी या मोहिमेची माहिती दिली. या मिशनचे काऊंटडाऊन 20 तासांचे असेल. याची सुरुवात 14 जुलैला सकाळी 6.51 वाजता होईल. या मोहिमेचं लाँचिंग 15 जुलैला पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरुन होईल. परदेशी माध्यमांचेही भारताच्या या मोहिमेकडे लक्ष असून त्यांनी ही मोहिम आव्हानात्मक असल्याचे म्हटले आहे.

15 मजली उंच ‘बाहुबली’ने होणार प्रक्षेपण

चंद्रयान-2 चे प्रक्षेपण भारताच्या सर्वाधिक शक्तिशाली जीएसएलवी मार्क-III (GSLV MK-III) रॉकेटने होणार आहे. या रॉकेटला ‘बाहुबली’ नाव देण्यात आले आहे. मोहिमेच्या सर्व प्रक्रिया व्यवस्थितपणे सुरु असल्याचीही माहिती शिवन यांनी दिली. रॉकेट बाहुबलीचं वजन 640 टन आहे. हे रॉकेट भारतातील आतापर्यंतचे सर्वात उंच रॉकेट आहे. याची उंची 44 मीटर म्हणजेच 15 मजली इमारती इतकी आहे. हे रॉकेट 4 टन वजनाच्या सॅटेलाईटला अवकाशात घेऊन जाण्यास सक्षम आहे. यात 3 टप्प्याचे इंजिन आहे. 

मोहिमेची वैशिष्ट्ये काय?

  • चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारी पहिली अवकाश मोहिम
  •  स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित पहिली भारतीय मोहिम
  • चंद्राच्या लुनार पृष्ठभागावर पोहचणारा भारत चौथा देश होणार

चंद्राच्या कधीही न पाहिल्या गेलेल्या क्षेत्रावरही भारताचं पाऊल

जीएसएलवी मार्क-III 3.8 टनाच्या चंद्रयान-2 स्‍पेसक्राफ्टला घेऊन जाणार आहे. बाहुबली रॉकेटच्या निर्मितीसाठी 375 कोटी रुपये खर्च आला आहे. जवळजवळ 16 मिनिटांमध्ये हे रॉकेट चंद्रयान-2 ला पृथ्‍वीच्या 170×40400 मिलोमीटर कक्षेत पोहचवेल. हे स्पेसक्राफ्ट चंद्रयान-2 ला 6 किंवा 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरण्याचा अंदाज आहे. ही भारताची महत्त्वकांक्षी मोहिम आहे. कारण चंद्रयान-2 चंद्रावरील दक्षिण ध्रुवावरील क्षेत्रात पोहचणारे आणि माहिती गोळा करणारे पहिले स्पेसक्राफ्ट असेल. याआधी या भागात कोणतेही स्पेसक्राफ्ट गेलेले नाही.

चंद्रयान-2 मोहिमेचे तीन टप्पे 

चंद्रयान-2 मोहिमेमध्ये तीन टप्पे असणार आहे. या तिन्ही टप्प्यांचा या मोहिमेत महत्त्वाचा वाटा असेल. यातील पहिला भाग लँडरचे नाव विक्रम ठेवण्यात आले आहे. याचे वजन 1400 किलो आणि लांबी 3.5 मीटर आहे. यात 3 पेलोड (वजन) असतील, ज्याचा उपयोग चंद्रावर उतरल्यानंतर रोवरला स्थिर करण्यासाठी होईल. मोहिमेचा दुसरा भाग ऑर्बिटर असेल याचे वजन 3500 किलो आणि लांबी 2.5 मीटर आहे. याच्यासोबत 8 पेलोड असतील. ऑर्बिटर या पेलोडसह चंद्राच्या परिक्रमा करेल. तिसरा भाग रोवर असून याचे वजन 27 किलो आहे. रोवर सोलर एनर्जीवर चालेल आणि आपल्या 6 पायांसह चंद्राच्या पृष्ठभागावर फिरुन येथील काही नमुणे गोळा करेल.

परदेशी माध्यमांचेही भारताच्या मोहिमेवर लक्ष

‘द वॉशिंग्टन पोस्‍ट’ने या मोहिमेला अत्यंत गुंतागुतीचे आणि आव्हानात्मक म्हटले आहे. या मोहिमेमुळे चंद्राचा नकाशा तयार करण्यास मोठी मदत होईल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. तसेच यातून चंद्रावर मॅग्निशिअम, अॅल्युमिनिअम, सिलिकॉन, कॅल्शिअम, टाइटेनिअम, आयरन आणि सोडिअम या घटकांचे किती अस्तित्व आहे याचाही तपास करता येणार आहे. यासोबत सर्वात महत्त्वाचे म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेल्या खड्ड्यांमध्ये बर्फाच्या स्वरुपातील पाण्याचाही तपास करता येणार आहे.

मोहिमेतील आव्हाने काय?

पृथ्वीपासून चंद्राचे अंतर जवळपास 3,844 लाख किमी आहे. त्यामुळे पृथ्वीवरुन कोणताही संदेश पाठवल्यास तो चंद्रावर पोहचण्यास काही मिनिटं वेळ लागणार आहे. तसेच सोलर रेडिएशनचाही चंद्रयान-2 वर दुष्परिणामही होऊ शकतात. त्यामुळे सिग्नल कमकुवत होऊ शकतो.

दरम्यान, 10 वर्षांपूर्वी ऑक्टोबर 2008 मध्ये चंद्रयान-1 चे प्रक्षेपण झाले होते. यात एक ऑर्बिटर आणि इम्पॅक्टर होता, मात्र रोवर नव्हता. चंद्रयान-1 चंद्राच्या कक्षेत गेले, मात्र चंद्रावर उतरले नाही. हे स्पेसक्राफ्ट चंद्राच्या कक्षेत 312 दिवस राहिले. या मोहिमेत चंद्राबाबतच्या माहितीची काही आकडेवारीही पाठवली होती. या मोहिमेत पाठवलेल्या माहितीमुळेच चंद्रावर बर्फाचे पुरावे मिळाले होते.