कार विक्रीसाठी ‘मारुती’ उडी ! इंडियन बँकेशी केला करार, 90 टक्के कर्जासह ऑफर्सचा पाऊस!

| Updated on: Apr 28, 2022 | 5:55 PM

या योजनेअंतर्गत ग्राहकांना कारच्या ऑन रोड किंमतीच्या 90 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळणार आहे. यासह, त्याच्यावर शून्य प्रक्रिया शुल्क, 30 लाख रुपयांचे मोफत अपघाती विमा संरक्षण, मोफत फास्टॅग आणि दीर्घ मुदतीची कर्जेही दिली जात आहेत.

कार विक्रीसाठी मारुती उडी !  इंडियन बँकेशी केला करार, 90 टक्के कर्जासह ऑफर्सचा पाऊस!
इंडियन बॅंक, मारुती सुझुकी
Follow us on

मुंबई : कार विक्रीसाठी मारुतीने (Maruti Suzuki Manufacturer) मारुती उडी घेतली आहे. या उडीचा कंपनी सोबतच ग्राहकांनाही मोठा फायदा होणार आहे. मारुतीच्या ग्राहकांना आता मिळणार वाहन कर्ज मिळणे आणखी सोपं झालं आहे. आपल्या ग्राहकांना सुलभ अटींवर कर्जपुरवठा करण्यासाठी या चारचाकी वाहन उत्पादक कंपनीने इंडियन बँकेशी (Indian Bank) करार केला आहे. मारुतीच्या म्हणण्यानुसार, इंडियन बँकेच्या माध्यमातून कार खरेदीदारांना चारचाकी वाहन खरेदीसाठी वाहन कर्जासोबत (Car Loan) ऑफर्सचा अक्षरशः पाऊस पडणार आहे. यामध्ये प्रक्रिया शुल्क माफ करण्यापासून ते दीर्घ मुदतीच्या कर्जापर्यंतचा समावेश आहे. या भागीदारीसह, मारुतीने अन्य 37 वित्तीय संस्थांशी किरकोळ वित्तपुरवठ्यासाठी करार केले गेले आहेत. यात 12 सरकारी बँका, 11 खासगी बँका, 7 एनबीएफसी आणि 7 प्रादेशिक ग्रामीण बँका यांचा समावेश आहेत.

मारुती सुझुकीच्या मते, या भागीदारीच्या मदतीने कंपनीच्या ग्राहकांना इंडियन बँकेच्या 5700 शाखांच्या माध्यमातून सुलभ अटींवर कर्ज मिळेल. या विशेष योजनेअंतर्गत ग्राहकांना कारच्या ऑन रोड किंमतीच्या 90 टक्क्यांपर्यंत कर्ज मिळणार आहे. यासोबतच त्यांना झीरो प्रक्रिया शुल्क देण्यात येत आहे. इंडियन बँकेच्या माध्यमातून कार लोन घेतल्यावर ग्राहकाला 30 लाख रुपयांचे मोफत अपघाती विमा संरक्षण आणि मोफत फास्टॅगही देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत 84 महिन्यांच्या कालावधीसाठी कर्ज दिले जात आहे, ज्यामुळे ग्राहकांचा ईएमआय (EMI) ही कमी होईल. ही योजना 30 जून 2022 रोजीपर्यंत लागू राहणार आहे. या भागीदारीच्या घोषणेनंतर मारुतीचे ईडी शशांक श्रीवास्तव यांनी सांगितलं की, देशातील 80 टक्के चारचाकी या कर्जाच्या माध्यमातून खरेदी केल्या जातात. आणि या संदर्भात ग्राहकांना मदत करण्यासाठी मारुतीने बँका आणि एनबीएफसीसोबत भागीदारी केली आहे. त्यांच्या मते, इंडियन बँकेसोबत झालेल्या करारामुळे ग्राहकांच्या वित्तपुरवठ्याच्या गरजा पूर्ण होण्यास मोठी मदत होणार आहे. मारुती ही देशातील सर्वात मोठी कार कंपनी आहे, मारुतीची 2156 शहरे आणि निम्न शहर, मोठ्या गावांमध्ये 3357 हून अधिक नवीन कार रिटेल आउटलेट आहेत.

मार्चमध्ये मारुतीच्या विक्रीत 2 टक्के वाढ

मारुती सुझुकी इंडियाने मार्चमध्ये एकूण घाऊक विक्रीत 2 टक्के वाढ नोंदवली असून, त्यांच्या एकूण 1,70,395 कारची विक्री झाली आहे. मार्च 2021 मध्ये कंपनीने 1,67,014 कारची विक्री केली होती. मात्र, कंपनीने देशांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या वाहनांची संख्या मार्च 2021 मध्ये 1,55,417 युनिटवरून सात टक्क्यांनी घटून 1,43,899 इतकी विक्री झाली. कंपनीने आर्थिक वर्ष 2020-21 च्या तुलनेत 13 टक्के वाढीसह गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये एकूण 16,52,653 युनिट्सची विक्री केली. एकूण विक्रीमध्ये देशांतर्गत 13,65,370 युनिट्सची, इतर मूळ उपकरण उत्पादकांना (ओईएम) 48,907 युनिट्स विक्री समाविष्ट आहे आणि आतापर्यंत 2,38,376 युनिट्स बहुतांश निर्यातीचा समावेश आहे.