
आजकाल अनेकजण प्रवास सुखकर करण्यासाठी किंवा उशिरा रात्री घरी जाताना कॅबचा वापर करतात. पण कधीकधी महिलांना या कॅबमध्ये वाईट अनुभव येतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला आपली व्यथा सांगत रडताना दिसत आहे. आता या महिलेसोबत नेमकं काय घडलं होतं चला जाणून घेऊया…
महिलेला व्हिडीओमध्ये अश्रू अनावर झाल्याचे दिसत आहे. रॅपिडो कॅब ड्रायव्हरने त्या महिलेला अतिशय वाईट वागणूक दिली. तिला शिवीगाळ केली. त्यानंतर तिला भर रस्त्यात गाडीतून खाली उतरवले. रात्रीच्या अंधारात ऑफिसवरुन घरी परतत असताना महिलेला हा अनुभव आला आहे. तिचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच त्या महिलेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
नेमकं काय घडलं?
ही घटना १५ डिसेंबरची आहे. इन्स्टाग्रामवर @stargirl_on_the_go नावाच्या एका युजरने संपूर्ण घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. कॅबमधून प्रवास करताना ती महिला केवळ फोनवर बोलत होती आणि कॅबमध्ये म्युझिक खूप जोरात होदते. तिने ड्रायव्हरला म्युझिक बंद करण्यास सांगितले. गुरुग्रामच्या या महिलेच्या म्हणण्यानुसार, तिने ड्रायव्हरला दोनदा आवाज कमी करण्यास सांगितले, पण त्याने ते ऐकले नाही. तिसऱ्यांदा जेव्हा तिने पुन्हा म्युझिक कमी करण्यास सांगितले, तेव्हा ड्रायव्हरला राग अनावर झाला. ड्रायव्हरने महिलेला अपशब्द वापरत सांगितले, “तुझ्या बापाची गाडी आहे का? फोनवर बोलायचे असेल तर उतर माझ्या गाडीतून आणि जाऊन आपल्या बापाच्या गाडीत बस.”
रात्रीच्या अंधारात तिला रस्त्यावर उतरवलं
या व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की महिला खूप घाबरलेली आहे. ड्रायव्हरने तिला थंडीत भर रस्त्यावर उतरवले. आरोप आहे की जेव्हा महिलाने दुसरी कॅब येईपर्यंत गाडीतच थांबण्याची विनंती केली, तेव्हा ड्रायव्हरने ‘आता तू पाहा’ म्हणत अचानक गाडी पळवली. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिने कशीबशी गाडी थांबवली आणि आपली जीव वाचवून बाहेर पडली.
पीडितेने हार मानली नाही
आश्चर्याची गोष्ट म्हणजे जेव्हा महिला तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेली, तेव्हा तिला न्याय मिळवून देण्याऐवजी सौदा करण्याचा दबाव सहन करावा लागला. महिलेचा आरोप आहे की पोलिसांनी तक्रार दाखल करण्याऐवजी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. पण ती मागे हटली नाही. तिने आपली आई आणि बहीणीलाही तिथे बोलावून घेतले. दुसऱ्याच दिवशी तिने डिस्ट्रिक्ट कोर्टात जाऊन ड्रायव्हरच्या विरोधात केस दाखल केली.
इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला महिलेचा व्हिडीओ
हा व्हिडिओ आता जवळपास १.५ कोटी वेळा पाहिला गेला आहे आणि २६ हजारांहून अधिक लोकांनी त्यावर कमेंट केले आहेत. व्हायरल क्लिप पाहून नेटकरींचे रक्त खवळले आहे. लोक कमेंट सेक्शनमध्ये रॅपिडोला टॅग करून ड्रायव्हरवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत.