
डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून अनेक जण त्यांच्या साथीदाराचा शोध घेतात. अर्थात यावर हवसे, नवसे आणि गवसे असतात. पण हे डेटिंग ॲप्स आता शिकाराची अड्डे होत आहेत. दिल्लीच नाही तर देशातील अनेक भागात या स्कॅमचे अनेक तरूण शिकार झाले आहेत. पण त्यातील काहींनीच तक्रार करण्याची हिंमत दाखवली आहे. या डेटिंग ॲप्सच्या माध्यमातून सुंदर तरुणी तरुणाला एखाद्या कॅफेत बोलवतात आणि मग त्याच्या खिशावर दिवसाढवळ्या दरोडा घालतात. पण आपण फसवल्या गेल्याचे हे तरुणाच्या पार उशीरा लक्षात येते.
डेटिंग ॲप्सवरून शोधतात शिकार
दिल्लीतील एका तरुणाला नुकताच याचा अनुभव आला. त्याची ओळख डेटिंग ॲप्सवर एका तरुणीशी झाली. सुरुवाती दोघांमध्ये चॅटिंग झाली. त्यानंतर तरुणीने त्याला दिल्लीतील ईस्ट ऑफ कैलास या कॅफेत भेटायला बोलावले. तिथे मस्त कॉफी घेत गप्पा मारण्याचे ठरले. हा मुलगा या डेटसाठी खिशात 3000 रुपये घेऊन गेला होता. फारतर 1000 रुपये खर्च होतील असे त्याला वाटले होते.
तिथे पोहचल्यावर तरुणीने गप्पांच्या ओघात ऑर्डरमागे ऑर्डर दिल्या. मासा आपल्या जाळ्यात अडकल्याचे तिने हेरले. त्याला गोड गोड गप्पात तिने गुंगवले. तिने महागडी खाद्यपदार्थ बोलावली होती. गप्पाटप्पा रंगल्यावर आणि तृप्तीचा ढेकर दिल्यावर ती तरुणी एक फोन आल्याच्या गडबडीने त्याला टाटा-बाय बाय करून निघाली. तोवर वेटरने बिल पुढ्यात केले. 12 हजार रुपयांचे बिल पाहून तरुणाला मोठा झटका बसला. त्याने मित्रांकडून युपीआयवर पैसे मागवत बिल अदा केले. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर त्याची आपबिती शेअर केली. मुंबईतही असे प्रकार होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे तरुणांची जमात सध्या चांगलीच कोमात आहे. सौंदर्याची भूरळ त्यांचा खिसा खाली करत असल्याचे समोर येत आहे.
बिल पाहून भाऊ तर उडालाच
पोट भरल्यावर तरुणीने कुणाचा तरी कॉल आल्याचे नाटक केले. वेटरने तरुणाकडे 11,958 रुपयांचे बिल दिले. ते पाहताच हा तरुण उडालाच. तेव्हा त्या मुलाने थोडं धिटाईने तरुणीला तू किती पैसे देशील असे विचारले. तेव्हा माझ्याकडे केवळ 100 रुपये असल्याची थाप तिने मारली. त्यानंतर पुन्हा भेटू असे म्हणत तिने काढता पाय घेतला.
हे सर्व इतक्या झटपट घडलं की त्या मुलाला काहीच सुचलं नाही. तरी त्याने अर्धे बिल त्या तरुणीकडून घेण्यास सांगितले. त्यावर कॅफे मालकानेच त्याला सुनावले. बिलाचे पैसे लागलीच दे नाही तर पोलिसांना बोलवण्याची धमकी दिली. आता या मुलासमोर 9000 जमा करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले होते. मग या पठ्ठ्याने त्याची कर्म कहाणी त्याच्या मित्रांना सांगितली. काहींनी युपीआय ॲप्सवर त्याला पैसे पाठवले. तर जे जवळ होते त्यांनी कॅफेत धाव घेतली. आपली फसवणूक झाल्याचे तरुणाच्या लक्षात आले. त्यामुळे डेटिंग ॲप्सवर अनोळखी व्यक्तीला भेटताना चारदा विचार नक्की करा.