रायगडावरच ‘अघोरी’ कृत्य; नवस फेडण्यासाठी भरत गोगावले यांनी बांधली पूजा? संभाजी ब्रिगेडच्या आरोपामुळे एकच खळबळ
Aghori Puja at Raigad Fort : रायगडावर अघोरी पूजा बांधल्याच्या आरोपाने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. संभाजी ब्रिगेडने मंत्री भरत गोगावले यांच्यावर केलेल्या आरोपाने पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रालाच बुवाबाजीच्या कठड्यात उभे केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातींना एकत्र करत स्वराज्याचे तोरण बांधले. त्यांनी हिंदवीपातशाही निर्माण करत रायगड ही राजधानी केली. स्वराज्याच्या या राजधानीतच अघोरी पूजा बांधल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केली आहे. रायगडावर मंत्री भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी केला आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नते सूरज चव्हाण यांनी सुद्धा भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा आरोप करत त्याविषयीचा एक व्हिडिओ शेअर केला.
सूरज चव्हाण यांचा आरोप काय?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांनी मंत्री भरत गोगावले यांनी अघोरी पूजा केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी दोन व्हिडिओ त्यांच्या ट्विटर, एक्स खात्यावरून शेअर केले आहेत. त्यात मंत्री गोगावले हे काही पूजा करताना दिसत आहेत. ही पूजा कशाची आहे, ती कशासाठी करण्यात आली याविषयीची माहिती समोर आलेली नाही. पण ही अघोरी पूजा असल्याचा दावा दादा गटाने केला आहे. अघोरी विद्येसाठी ही पूजा बांधण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे. चव्हाण यांनी दोन व्हिडिओ ट्विट केले आहे. त्यातील एक व्हिडिओ बंधिस्त जागेतील, चार भिंतीतील तर दुसरा व्हिडिओ हा मोकळ्या जागेतील आहे.
संभाजी ब्रिगेडचा तो आरोप काय?
रायगडावर नवसाचा अघोरी कृत्य करण्यात आल्याचा दावा संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी केला आहे. निवडून येण्यासाठी रायगडच्या भरत गोगावले यांनी नुसती अघोरी पूजाच घातली नव्हती तर त्यांनी मंत्रीपद मिळण्यासाठी शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी ‘नवस’ सुद्धा बोलला आणि तो फेडला, असा गंभीर आरोप संभाजी ब्रिगे़डने केला आहे.
महाराष्ट्रात रायगडाचे पावित्र्य राखले जात नसेल त्या सरकार आणि मंत्र्यांकडून काय अपेक्षा करायची, दुर्दैवी आहे आणि निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया संतोष शिंदे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि संभाजी ब्रिगेडने गोगावले यांच्यावर अघोरी पूजा बांधल्याचा आरोप केला आहे. त्यावर आता गोगावले काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
