VIDEO : 213 सोन्याचे दागिने आणि 380 कॅरेटपेक्षा जास्त हिऱ्यांनी साकारली सोन्याची रांगोळी, पाहून थक्क व्हाल
सोनं चांदी यांनी महागाईचा कळस गाठलेला असताना एक मॉलमध्ये चक्क सोन्याची आणि हिऱ्यांची रांगोळी साकारण्यात आली. या रांगोळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. कुठे आहे ही रांगोळी जाणून घ्या.

महागाईत सोनं, चांदीचा भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बारीकसं जरी काही सोन्याचं करायचं ठरवलं, तर लाखभर रूपये कुठेच गेले नाही. पण एका मॉलमध्ये सोन्याचे दागिने आणि हिऱ्यांनी भरलेली मोठी रांगोळी साकारण्यात आली. ही रांगोळी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. ही रांगोळी पाहून नेटकऱ्यांचे डोळेच पांढरे पडले आहेत. कुठे आहे ही रांगोळी?
दुबईतील सिटी सेंटर देयरा या प्रसिद्ध मॉलमध्ये दिवाळीनिमित्त ही खास गोल्डन रांगोळी तयार करण्यात आली आहे. दागिन्यांचा ब्रँड डॅमस आणि दुबईतील फेस्टिव्हल्स अँड रिटेल इस्टॅब्लिशमेंट यांच्या सहकार्याने हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. भारतीय परंपरेतील रांगोळीला एक शाही आणि आलिशान रूप देण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे.
6.5 किलो सोनं, 380 कॅरेट पेक्षा जास्त हिरे
या रांगोळीच मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिच्यासाठी वापरण्यात आलेले मौल्यवान दागिने. तब्बल 6.5 किलो वजनाचे 213 दागिने या रांगोळीत वापरण्यात आले. यामध्ये सोन्याचे हार, जाड बांगड्या, झुमके आणि पेंडंट्स यांचा समावे आहे. एवढचं नाही, तर या दागिन्यांमध्ये 380 कॅरेटपेक्षा जास्त वजनाचे अस्सल हिरेही आहेत.
10 कारागिरांची 16 तास मेहनत
अशी रांगोळी तयार करणं म्हणजे काही साधं काम नाही. प्रत्येक दागिना योग्य जागी ठेवणं आणि त्यातून सुंदर नक्षी साकारण्यासाठी प्रचंड मेहनत लागली. यासाठी 10 कुशल कारागिरांची सलग 16 तासांची मेहनत आहे.
मॉलमध्ये सोनं उघड्यावर पाहून नेटकरीही थक्क
या गोल्डन रांगोळीचा व्हिडिओ dubai festivals & retail events या सोशल मिडिया पेजवरून शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मॉलमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं आणि हिरे उघड्यावर ठेवलेले पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. एका नेटकऱ्याने ही रांगोळी अप्रतिम असल्यांच म्हटलं, तर दुसऱ्याने इतकं सोनं सार्वजनिक ठिकाणी ठेवणं दुबईतच शक्य असल्याचं म्हटलं आहे.