
आपल्या घरातील टॉयलेट सीटची किंमत साधारणपणे काही हजार इतकी असते. तर काही ठिकाणी ही किंमत लाखाच्या घरात असू शकते. पण एका टॉयलेट सीटची किंमत 100 कोटी रुपये (जवळपास 12 दशलक्ष डॉलर) असेल तर? पण हे खरं आहे. DW च्या वृत्तानुसार, 1 अब्ज रुपयांचे हे टॉयलेट सीट साधारण कमोड नाही. तर ते 18 कॅरेट शुद्ध सोन्यापासून तयार टॉयलेट सीट आहे. ते तयार करण्यासाठी जवळपास 101 किलो (223 पाऊंड) सोन्याचा वापर होतो.
सोन्यापासून तयार टॉयलेट कमोड
हे सोन्याचे टॉयलेट सीट जगातील प्रसिद्ध कलाकार मॉरिझिओ कॅटेलन्सने (Maurizio Cattelan) तयार केले आहे. या टॉयलेट सीटवर सोन्याचा मुलामा चढवलेला नाही. तर साच्यात वितळलेले सोने टाकून ते तयार करण्यात आले आहे. जर हे टॉयलेट कमोड वितळवून त्याचे बिस्किट केले तर त्याची आजची किंमत किती तरी कोटी होईल.
कोणी केले हे कमोड खरेदी?
या टॉयलेट सीटचा लिलाव न्यूयॉर्कमधील ब्रुयर इमारतीत करण्यात आला. सॉदबीज या संस्थेने हा लिलाव केला. लिलावाची सुरुवात 10 दशलक्ष डॉलरच्या बोलीने झाली. त्यानंतर त्यात इतर शुल्क मिळून त्याची किंमत 12.1 दशलक्ष डॉलर इतकी झाली. टॉयलेट कमोड एका अज्ञात व्यक्तीने खरेदी केले. मॉरिझिओ कॅटेलन्स यांनी या कलाकृतीचे नाव अमेरिका असे ठेवले आहे. त्यांनी हे सीट श्रीमंतांवरील व्यंग असल्याचा दावा केला. तुम्ही 200 डॉलरचे जेवण करा की 2 डॉलरचा हॉट डॉग खा, सर्वांचेच काम एकाच ठिकाणी पूर्ण होते, ते म्हणजे टॉयलेट, असा उपरोधीक टोला त्यांनी श्रीमंतांना लगावला. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी स्पष्ट करण्यासाठी ही कलाकृती तयार केल्याचा त्यांचा अजब दावा आहे.
Maurizio Cattelan’s ‘America’, a fully functional solid 18-karat gold toilet, sold for $12.1 million. pic.twitter.com/mX4priH75q
— Sotheby’s (@Sothebys) November 19, 2025
यापूर्वी चोरी झाले होते गोल्डन टॉयलेट सीट
मॉरिझिओ कॅटेलन्स यांनी अशा प्रकारचे तीन गोल्डन टॉयलेट तयार केले होते. पण सॉदबीज या लिलाव संस्थेनुसार, आता त्यांच्याकडे केवळ हिच एक कलाकृती उरली आहे. पहिल्यांदा शुद्ध सोन्यापासून तयार करण्यात आलेली टॉयलेट सीट कलाकृती न्यूयॉर्कमधील गुगेनहायम संग्रहालयात दिसली होती. एक लाखाहून अधिक लोक हे टॉयलेट सीट पाहण्यासाठी आले होते. तर 2019 मध्ये या टॉयलेटची दुसरी कलाकृती तयार करण्यात आली होती. ती ब्लेनहेम पॅलेसमधून चोरीला गेली होती. त्यानंतर ही कलाकृती एकदम चर्चेत आली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन चोरांना अटक केली होती. पण अद्यापही त्या चोरी झालेल्या गोल्डन टॉयलेट सीटचा पत्ता लागलेला नाही.