
भारतात लाखो लोक रोज ऑफिसला जातात आणि मग तिथे पूर्ण वेळ देतात. या काळात त्यांचे सहकारी चांगले मित्र बनतात, तर काही जण असे असतात की जे कामाशी काम ठेवतात. मात्र, काही लोकांना खूप वाईट अनुभव येतो, ज्यामुळे ते ऑफिसमध्ये एकटेच राहणे पसंत करतात. सोशल मीडियावर एक कोट खूप लोकप्रिय झाला आहे, जो आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा कोट शेअर करत त्यांनी विचारले, “तुम्हाला हे मान्य आहे की नाही?”
आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी आपल्या ट्विटमध्ये इंग्रजी कोट शेअर केला आहे. “तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रत्येकजण तुमचा मित्र नसतो. नोकरी करा, पगार मिळवा… .घरी जा…’
याचा अर्थ म्हणजे तुमच्या ऑफिसमधले सगळेच तुमचे मित्र नसतात, तुमचं काम करा, पगार घ्या आणि घरी जा. या कोटचा फोटो शेअर करत या अधिकाऱ्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘सहमत आहे की नाही’.
Agree or Not ? pic.twitter.com/VjOVJJB0i2
— Awanish Sharan (@AwanishSharan) November 15, 2022
काही तासांतच हे ट्विट सोशल मीडियावर खूप व्हायरल झालं आणि अनेकांनी याला संमती दिली. ही पोस्ट वाचल्यानंतर बहुतांश लोकांनी याचं समर्थन केलं होतं.
ही पोस्ट वाचून एका युझरने लिहिलं, ‘मला पटत नाही, कारण ऑफिस हे आमचं दुसरं घर आहे.’ एका तिसऱ्या युजरने म्हटले आहे की, ”मान्य सर, सहकाऱ्यांमध्ये प्रेम, सहकार्य आणि आपुलकीची भावना असल्याने स्पर्धा, शत्रुत्व, मत्सर, उपरोध, निंदा, परिस्थितीनुसार चुगली अशा गोष्टी असतात!”