
सकाळपासून उठून मरमर काम , ऑफीसमध्ये पडलेल्या पिट्ट्या, लोकल, बस, कार, ट्रेनचा प्रवास करून आंबलेलं शरीर आणि दमलेलं मन, किंवा झालेलं ब्रेकअप , नाहीतर एकटेपणामुळे आलेली उदासी.. अशावेळेला माणसाला काय हवं असतं ? डोक्याचवरून फिरलेला प्रेमळ हात किंवा एक छानशी घट्ट मिठी, सगळं ठीक होईल असा दिलेला विश्वास.. अशा वेळेस एखादा पुरूष ( पुरूष आई) येतो, काही सवाल नाही, काटी अटी नाहीत, फक्त 5 मिनिटांची एक झप्पी देतो, मिठी मातो आणि त्याबदल्यात 600 रुपये घेऊन जातो..
थांबा, थांबा, हा एखाद्या चित्रपटातला सीन नाहीये, तर हे खरंखुर घडतंय. हा ‘हगिंग ट्रेंड’ सध्या खूप लोकप्रिय आहे. चीनमध्ये सध्या या ट्रेंडने धूमाकूळ घातलाय. सोशल मीडियावरही सध्या या Man Mum ट्रेंडची बरीच चर्चा आहे.
चीनमध्ये, विशेषतः थकलेल्या तरूणींणध्ये, हा ट्रेंड वाढत्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. ऑफिसमध्ये ओव्हरटाईम करण्यापासून ते ब्रेकअपपर्यंत, जेव्हा जेव्हा एखाद्या मुलीला एकटं वाटतं, तेव्हा ती तिच्या पुरूष आईच्या (Man Mum ) कुशीत 5 मिनिटांची ‘थेरपी’ शोधते.
मसल्सवाले पुरूष.. पण हृदय आईप्रमाणे !
साउथ चायना मॉर्निंग पोस्ट (SCMP) नुसार, सुरुवातीला ‘मॅन मम्स’ फक्त मस्क्युलर जिममध्ये जाणारे बॉडीबिल्डर मानले जात होते. पण आता त्यांचा अर्थ बदलला आहे. आता हे असे पुरुष आहेत ज्यांच्याकडे केवळ ताकदच नाही तर आईसारखी कोमलता देखील आहे. ते प्रेमाने बोलतात, धीर देतात आणि अशा व्यक्तीसारखे वागतात जो तुमचा थकवा, ताण आणि दुःख काही काळासाठी स्वतःच्या खांद्यावर घेऊ शकतो.
कशी झाली या ट्रेंडची सुरुवात ?
या ट्रेंडची सुरुवात एका थकलेल्या मुलीने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे झाली. एक थिसिस (प्रबंध) लिहिण्यासाठी तिला एका झप्पी ( मिठी) हवी होती आणि त्यासाठी ती पैसेही मोजायला तयार होती. तिने लिहिलं, ‘शाळेत एकदा मला मिठी मिळाली होती, ती खूप सुखदायक होती. आताही मला फक्त 5 मिनिटांची मिठी हवी आहे.’ आणि मग काय! हजारो मुलींनी वेइबो (चिनी ट्विटर) आणि डोयिन सारख्या चिनी सोशल प्लॅटफॉर्मवर ‘Man Mum’ शोधण्यास सुरुवात केली.
कसे सापडतात ‘Man Mum’ ?
या ‘Man Mum’ अर्थात पुरूष मातांना भेटण्यासाठी, एखादी मुलगी प्रथम त्यांच्याशी चॅटवर बोलते – त्या ( माणसाचा) स्वभाव, शरीरयष्टी आणि बोलण्याच्या पद्धतीवर आधारित, तो पुरूष आई तिच्यासाठी परिपूर्ण आहे की नाही हे ठरवले जाते. मग भेटण्याचे ठिकाण ठरवले जाते – उदाहरणार्थ मेट्रो स्टेशन, शॉपिंग मॉल किंवा पार्क. मिठीची किंमत निश्चित असते जी सहसा 250 ते 600 रुपयांपर्यंत असते. आणि हो, कधीकधी मुलींनाही मिठी देण्यासाठी बुक केले जाते!
मिठी मारल्यानंतर काय वाटतं ?
एका रिपोर्टनुसार, एका महिलेने सांगितले की जेव्हा तिने ओव्हरटाईम करून थकून गेल्यानंतर एका पुरुष आईला कामावर ठेवले तेव्हा तो तिच्या खांद्यावर हात ठेवून शांतपणे तिचे बोलणे ऐकायचा – आणि त्यामुळेच तिचा मूड हलका व्हायचा. दुसऱ्या एका मुलीने सांगितले की जेव्हा ती दुःखी होती तेव्हा ती जवळच्या कॉलेजमधील एका विद्यार्थ्याला मिठी मारायची आणि त्यानंतर ते दोघेही बसून कॉफी पित असताना आयुष्याबद्दल बोलायचे
‘Man Mum’ ला काय करावी लागते तयारी ?
‘Man Mum’ म्हणजेच पुरुष मातांसाठी, हे फक्त एक काम नाही तर ती एक जबाबदारी देखील आहे. म्हणून मिठी मारण्यापूर्वी, ते त्यांचे केस नीट राखतात, चांगले, डिसेंट कपडे घालतात, छान परफ्यूम लावतात आणि स्वतःला असे सादर करतात की जणू काही ते मनोरंजन करण्याच साधन नव्हे तर भावनिक थेरपिस्ट आहेत.
‘जेव्हा एखादी मुलगी हसून धन्यवाद म्हणते तेव्हा मला असं वाटतं की माझ्या असण्याल काही अर्थ आहे.’ असं एकाने सांगितलं. दुसऱ्याने सांगितले की तो पैसे घेतो जेणेकरून भावनिक अंतर राखले जाईल आणि गोष्टी खूप पर्सनल होऊ नयेत.
अनेक मुलींना ही सेवा सुरक्षित वाटते कारण ती मिठी वगैरे सर्व काही सार्वजनिक ठिकाणी घडतं. उदा – मॉल, स्टेशन, पार्क . सर्व काही चॅटमध्ये आधीच ठरवले जातं आणि आणि मिठीसाठी पैसे देऊन हे स्पष्ट केलं जातं की तिथे कोणतीहीथे ‘वैयक्तिक भावना’ नाही, फक्त व्यावसायिक कंफर्ट आहे. बऱ्याच मुली म्हणतात की जेव्हा एखादा मुलगा मोफत मिठी मागतो तेव्हा त्याचे हेतू संशयास्पद वाटतात, परंतु त्यासाठी पैसे देऊन, एखाद्याला एक स्वच्छ आणि व्यावसायिक भावना मिळते.
हा ट्रेंड पाहिल्यानंतर, एक गोष्ट नक्की स्पष्ट होते की मिठी ही केवळ प्रेमाची अभिव्यक्ती नाही तर ती मानसिक आरोग्यासाठी एक उपचार, थेरपी देखील बनली आहे.