
गुरूग्राममध्ये आलिशान जगणे किती महागात पडत आहे, याविषयीची एक पोस्ट सध्या तुफान वेगाने समाज माध्यम लिंक्डइनवर पसरली आहे. महागड्या शहरात तुम्ही आलिशान आशियाना खरेदी केल्यावरही तुमच्यासमोर अडचणींचा डोंगर तोंड वासून उभा असतो. तुमचे खर्च कमी होत नाहीत. उलट वाढतात. वैभव नावाच्या एका स्टार्टअप्सच्या मालकाने ही पोस्ट लिहिली आहे. तो गुरूग्राममधील एका आलिशान परिसरात राहतो. माझ्याकडे गुरुग्राममध्ये एक घर आहे. म्हणजे मला महिन्याला श्वास घेण्यासाठीच 7.5 लाख रुपये मोजावे लागतात, अशी पोस्ट त्याने लिहिली आहे.
खर्चाची यादीच टाकली
वैभवने दर महिन्याला त्याला गुरुग्राममध्ये राहण्यासाठी किती खर्च येतो याचे हिशेबच मांडला आहे. 3 कोटींच्या या घरासाठी त्याला दरमहा 2.08 लाख रुपयांचा हप्ता भरावा लागतो. तर घरातील कारंजाच्या देखभालीसाठी 12 हजार रुपये द्यावे लागतात. तर महागड्या कारचा हप्ता म्हणून 60 हजार रुपये दरमहा मोजावे लागतात. कारण या भागात कोणाकडेच साधी कार नाही. परदेश यात्रेसाठी “प्रूफ ऑफ लाईफ” साठी 30,000 द्यावे लागतात. घरातील कूक, मेड आणि ड्रायव्हरवरील पगारापोटी 30 हजार, तर क्लब नाईट्स आणि डिनरसाठी 20,000 मोजावे लागतात. तर “DLF फेज 5 रेडी” दिसण्यासाठी ग्रुमिंग आणि कपड्यांवर तो 12 हजार रुपये खर्च करतो. शॉपिंगवर 10 हजार तर लग्न, बर्थडे गिफ्ट्ससाठी 15 हजार रुपये द्यावे लागतात. हे सर्व फेक स्माईल टॅक्स असल्याचे तो सांगतो.
हे सर्व खर्च जोडले तर महिन्याला त्याला 5 लाख रुपये खर्च करावे लागतात. पण जर सर्व कर जोडले तर हा खर्च करण्यासाठी महिन्याला व्यक्तीची कमाई 7.5 लाखांच्या घरात हवी. म्हणजे वर्षाला जवळपास 90 लाख रुपये कमाई हवी. इतका खर्च आहे की बचत आणि विमा दोन्ही गोष्टी होत नसल्याचे तो म्हणाला. तर मी अजून काहीच खाल्ले सुद्धा नसल्याचे गंमतीत तो पोस्टमध्ये लिहितो.
अर्थात या पोस्टवर अनेकांनी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुद्धा केली आहे. काहींच्या मते जी व्यक्ती 3 कोटींचा फ्लॅट खरेदी करतो, त्याची आर्थिक स्थिती चांगलीच असेल, मग हे नाटक करण्याची गरज नाही. काहींच्या मते गुरूग्राममध्ये राहणे काही सोपे नाही. ईएमआयशिवाय राहायचे असले तरी या शहरात 3 लाख रुपये तरी लागतातच असा दावा युझर्स करत आहेत.