‘पाणी बंद केले तर आम्ही तुमचा श्वास बंद करु’, दहशतवादी हाफिज सईद याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल

तुम्ही पाणी बंद कराल तर आम्ही तुमचा श्वास बंद करु. खोऱ्यांमध्ये रक्त वाहील, अशी धमकी देणारा हाफिज सईद याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने सोशल मीडियावर व्हायरल केला असल्याचा दावा केला जात आहे.

पाणी बंद केले तर आम्ही तुमचा श्वास बंद करु, दहशतवादी हाफिज सईद याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल
hafiz saeed
| Updated on: Apr 24, 2025 | 5:29 PM

Indus Water Treaty: जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये भीषण दशतवादी हल्ला मंगळवारी झाला. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर निर्णय घेतले. भारताने सिंधू नदी करार रद्द केला आहे. त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओतून हाफिज सईद याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी दिली आहे. “जर तुम्ही पाकिस्तानचे पाणी थांबवले तर आम्ही तुमचा श्वास थांबवून टाकू. खोऱ्यांमध्ये रक्त वाहील”, अशी धमकी देणारा हाफिज सईद याचा व्हिडिओ आहे.

दहशतवादी हाफिज सईद याचा जुना व्हिडिओ व्हायरल करून पाकिस्तान भारताला धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दहशतवादी हाफिज सईद भारताविरुद्ध विष ओकत आहे. तो म्हणतो, ‘मोदी तुम्ही ढाका विद्यापीठात बांगलादेशमध्ये म्हणाला, पाकिस्तान आम्ही तोडले. तुम्ही बोलोल तर आम्ही बोलू. तुम्ही म्हणता की पाकिस्तानचे पाणी थांबवाल. काश्मीरमध्ये धरणे बांधून पाणी आडवाल. तुम्हाला पाकिस्तानला उद्धवस्थ करायचा आहे. तुम्हाला चीन-पाकिस्तान कॉरिडॉरच्या योजना उधळून लावायच्या आहेत. तुम्ही पाणी बंद कराल तर आम्ही तुमचा श्वास बंद करु. खोऱ्यांमध्ये रक्त वाहील.’ हा व्हिडिओ पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने सोशल मीडियावर व्हायरल केला असल्याचा दावा केला जात आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने अनेक कठोर पावले उचलली आहेत. भारताने नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्करी, नौदल आणि हवाई सल्लागारांना एका आठवड्यात भारत सोडण्याचे आदेश दिले आहे. भारताने इस्लामाबादमधील आपल्या उच्चायुक्तालयातील संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागारांना परत बोलावले आहे. तसेच सिंधू नदी पाणी वाटप करार रद्द केला आहे.

सिंधू पाणी करारानंतर भारताने अनेक कठोर पावले उचलली आहेत. भारताने अटारी सीमा देखील बंद केली आहे. भारताच्या कठोर उपाययोजनांनंतर पाकिस्तानकडून शुक्रवारी काही निर्णय घेण्यात आले. पाकिस्तानने भारताला त्यांची एअर स्पेस वापरण्यास बंदी केली आहे.