आमच्यासाठी दुआ करा… पूरस्थितीचं रिपोर्टिंग करताना बोट हलली अन् पाकिस्तानी पत्रकार किंचाळली; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

तुम्ही अनेक पत्रकारांना पूरग्रस्त भागात जाऊन रिपोर्टिंग करताना पाहिलेले असेल. आता पाकिस्तानातील एका महिला पत्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आमच्यासाठी दुआ करा... पूरस्थितीचं रिपोर्टिंग करताना बोट हलली अन् पाकिस्तानी पत्रकार किंचाळली; व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
Pak Reporter
| Updated on: Aug 29, 2025 | 9:24 PM

पाकिस्तानात गेल्या काही दिवसांपासून पूरस्थिती निर्माण झालेली आहे. यात आतापर्यंत शेकडो लोकांचा जीव गेला आहे. तसेच पशुधनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आताही पूरस्थिती कायम आहे. तुम्ही अनेक पत्रकारांना पूरग्रस्त भागात जाऊन रिपोर्टिंग करताना पाहिलेले असेल. अनेकजण जीव धोक्यात घालून पाण्यात उतरत रिपोर्टिंग करत असतात. आता पाकिस्तानातील एका महिला पत्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक पाकिस्तानी महिला पत्रकार एका बोटीत बसून पुराच्या पाण्यात शिरते. तिने लाईफ जॅकेटही घातलेले आहे. तसेच तिच्यासोबत इतरही काही लोक बोटीत आहेत. मात्र ती पुराबाबत माहिती देत असताना अचानक बोट हलू लागते. त्यामुळे ती घाबरते आणि जोरात ओरडते. ती म्हणते की, ‘मला खूप भीती वाटत आहे. मात्र तिच्या हावभावांवरून असे वाटत आहे की, ती नाटक करत आहे, त्यामुळे अनेकांनी हा व्हिडिओ व्हायरल करण्याच्या उद्देशाने बनवला गेला असल्याची शक्यता वर्तवली आहे.

पंजाब प्रांतातील व्हिडिओ

समोर आलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील आहे. या व्हिडिओ पाकिस्तानी रिपोर्टर मेहरुन्निसा पुराबाबत माहिती सांगताना दिसत आहे. तिच्या हातात असलेल्या माइकवर बीबीसी उर्दू लिहिलेले आहे. म्हणजे ती बीबीसी या वृत्तवाहिनीची पत्रकार आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणत आहे की, “मला सध्या खूप भीती वाटत आहे. कारण कधीकधी आमची बोट एका बाजूला कलते तर कधीकधी दुसऱ्या बाजूला. आम्हाला तोल सांभाळता येत नाही, त्यामुळे तुम्ही सर्वजण आमच्यासाठी दुआ करा!”

यापूर्वीही अनेक पाकिस्तानी रिपोर्टर व्हायरल

या महिला रिपोर्टरचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तसेच तो वेगवेगळ्या अकाऊंटवरूनही पोस्ट करण्यात आला आहे. रिपोर्टिंग दरम्यान मोठ्याने ओरडल्याने ही रिपोर्टर चर्चेत आली आहे. पाकिस्तानी रिपोर्टर आपल्या विचित्र रिपोर्टिंगमुळे चर्चेत येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने बजरंगी भाईजान या चित्रपटात रिपोर्टिंग सीन करताना चांद नवाब या पाकिस्तानी रिपोर्टरची नक्कल केली होती. त्याची क्लिपही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. त्यानंतर आता या महिला रिपोर्टरची क्लिप व्हायरल झाली आहे.