मित्रावर जीव जडला, मैत्रीसाठी तो सापाशी भिडला; कुत्र्याचा कमालीचा करारी बाणा

सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेला व्हिडिओ देखील अशाच घट्ट मैत्रीचा पुरावा ठरला आहे. ही मैत्री जीव धोक्यात घालून जपली गेली आहे.

मित्रावर जीव जडला, मैत्रीसाठी तो सापाशी भिडला; कुत्र्याचा कमालीचा करारी बाणा
मैत्रीसाठी तो सापाशी भिडला
Image Credit source: social
| Updated on: Nov 01, 2022 | 11:33 PM

काही प्राणी हे एकमेकांचे पूर्वापार शत्रू मानले जातात, त्यांच्यामध्ये हाडाचे वैर असते तर काही प्राण्यांमधील मैत्री फार घट्ट असते. ते प्राणी एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. मग मैत्रीचे बंध जपत असताना ते स्वतःच्या जीवाची पर्वा करीत नसल्याचे अनेकदा आढळते. सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेला व्हिडिओ देखील अशाच घट्ट मैत्रीचा पुरावा ठरला आहे. ही मैत्री जीव धोक्यात घालून जपली गेली आहे. मैत्रीचे बंध जपणारा प्राणी आहे कुत्रा. त्याने पाळीव पोपटाला वाचवण्यासाठी सापाशी कडवा संघर्ष केला आहे. सापाशी तो ज्याप्रकारे भिडला, त्याला तोड नाही, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियामध्ये व्यक्त होत आहे.

तोंडाने शेपटी खेचून सापाला जमिनीवर आपटले

कुत्र्याने पोपटाला सापाच्या तावडीत वाचवण्यासाठी केलेला थरारक प्रयत्न सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला याची प्रचिती नक्कीच येईल. एक पाळीव पोपट पिंजऱ्यात बंदिस्त आहे. त्या पिंजऱ्यामध्ये साप घुसला आहे आणि तो पिंजऱ्यातील पोपटावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतोय.

तितक्यातच कुत्र्याने त्या सापाचा डाव हेरला. काहीही करून पोपटाच्या जीवावरील धोका परतावून लावायचा हा चंगच कुत्र्याने बांधला. कुत्र्याने स्वतःच्या जीवाचा विचार न करता सापाच्या शेपटालाच पकडले आणि त्याला पिंजऱ्यातून बाहेर खेचण्याचा शर्थीचा प्रयत्न सुरू ठेवला.

विशेष म्हणजे त्यात तो यशस्वी झाला. त्याने सापाला तसेच फरफटत बाहेर नेऊन फेकले. कुत्र्याची ही हिंमत पाहून सोशल मीडियातील युजर्स भलतेच चकित झाले आहेत. मैत्री आणि हिम्मत कशी असावी, याचे उत्तम उदाहरण म्हणून हा व्हिडिओ व्हायरल केला जात आहे.

अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

सोशल मीडियामध्ये प्राण्यांचे बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातही संघर्षाचे व्हिडिओ म्हटले तर साप आणि मुंगूस यांच्यातील असतात. कुत्रा आणि साप यांच्यातील संघर्षाचा दुर्मिळ असा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यामुळे या संघर्षाचा थरारक अनुभव पाहण्याची संधी सोशल मीडियातील युजर्स दवडत नसल्याचे दिसते.

व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून तितक्याच लोकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. व्हिडिओ पाहताना अंगावर काटे उभे न राहिले तर नवल.