
भारतात व्हायरल झालेल्या एका रशियन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने दिल्लीतील फॉरेनर्स रीजनल रजिस्ट्रेशन ऑफिस (FRRO)मध्ये आपल्याशी गैरवर्तन झाल्याचा आरोप केला आहे. इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर ‘कोको इन इंडिया’ नावाने प्रसिद्ध असलेल्या या मुलीचा आरोप आहे की, तिथे केवळ तिचा मोबाइल तपासला गेला नाही, तर वैयक्तिक प्रश्नही विचारले गेले. तसेच ती हॉटेल्समध्ये का जाते? असा प्रश्नही विचारण्यात आला. कथित प्रश्नांमुळे दुखावलेल्या या इन्फ्लुएन्सरने इन्स्टाग्रामवर तीन व्हिडीओ शेअर करून संपूर्ण प्रकरण सांगितले आणि आपल्यावर लावलेल्या आरोपांबाबत पुरावे मागितले आहेत.
नेमकं काय घडलं?
कोको नावाने प्रसिद्ध असलेल्या या रशियन मुलीचे खरे नाव क्रिस्टीना आहे. ती बराच काळ भारतात राहत आहे. भारतीय संस्कृती, खानपान आणि बॉलिवूडच्या गाण्यांवर नृत्य करतानाचे तिचे व्हिडीओ नेहमीच व्हायरल होतात. हिंदीत बोलून सर्वांचे मन जिंकणाऱ्या क्रिस्टीना उर्फ कोकोला 4.79 लाख लोक फॉलो करतात. क्रिस्टीनाने तीन दिवसांपूर्वी तीन व्हिडीओ शेअर केले आणि तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराविषयी सांगितले. दरम्यान ती भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
वाचा: बलात्कार इन्स्टाग्रामवर LIVE दाखवला, तीन तरुणींसोबत भयंकर घडलं, पाशवी कृत्याने खळबळ!
तू हॉटेलमध्ये का राहिली?
व्हिडीओमध्ये क्रिस्टीना म्हणाली की, ‘मला भारतीय कायद्यांची फारशी माहिती नाही. कदाचित मी चुकले असेल. जर मी चूक असेल तर मला माफ करा. मी फक्त विचारू इच्छिते की, कोणाला याबाबत माहिती असेल का? नवी दिल्लीतील आरकेपुरम येथील FRRO च्या रूम नंबर 303 मधील कर्मचाऱ्यांनी माझा फोन घेतला. त्यामधील वेगवेगळ्या चॅट्स तपासल्या. माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत प्रश्न विचारले. त्यांनी एका सहकाऱ्याला माझ्याकडे बोट दाखवून हसत म्हटलं, ‘पाहा…’. मला माहिती नाही की हे कायदेशीर आहे का? कदाचित त्यांना असं करायला हवं. पण मी इतर लोकांबाबत असं होताना पाहिलं नाही. त्यांनी इतरांचे फोन घेतले नाहीत.’
‘कदाचित त्यांना वाटलं असेल की मी देशासाठी धोकादायक आहे, जसं की दहशतवादी किंवा ड्रग डीलर. म्हणूनच माझा फोन तपासण्याची गरज भासली असेल. मी देशाच्या सुरक्षेची बाब समजते. जर त्यांनी असं करणं योग्य असेल तर मी माफी मागते. तिथे रूम नंबर 303 मध्ये एका मॅडमने मला विचारलं की, तू वसंत कुंजमध्ये भाड्याने राहतेस, मग वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये का जाते? मला सर्व काही समजते, फक्त तुमच्याकडून मला सत्य जाणून घ्यायचं आहे. त्यांनी सतत मला प्रश्न विचारले आणि मला काही बोलू दिलं नाही. मी समजते की तुम्ही मला वेश्या मानता. याची तपासणी करणं खूप सोपं आहे’ असे क्रिस्टीना पुढे म्हणाली.
क्रिस्टीनाने सांगितलं की, तिच्या प्रियकरापासून वेगळं झाल्यानंतर ती सफदरजंग एनक्लेव येथील एका हॉटेलमध्ये राहण्यासाठी गेली होती. ती म्हणाली, ‘तिथल्या रजिस्टरमधील नोंद तपासून तुम्ही पाहू शकता की मी कोणासोबत तिथे राहिले होते. जर तुम्ही मला सांगाल की मी दुसऱ्या कुठल्या हॉटेलमध्ये गेले होते, तर मी माफी मागेन. मी मान्य करेन की क्रिस्टीना खोटी आहे, वेश्या आहे, इतकी घाणेरडी स्त्री आहे की तिला मरायला हवं. मी एकदा पुणे आणि जयपूरला गेले तेव्हा हॉटेलमध्ये राहिले. याशिवाय मी यावर्षी दिल्लीत कोणत्याही हॉटेलमध्ये राहिले नाही. जर तुम्ही पुरावा आणलात तर मी मानेन की मी नीच स्त्री आहे, वेश्या आहे.’ हे सर्व सांगताना क्रिस्टीना भावूक झाली.