Viral Video : बाप्पाला मोदक नाही तर चक्क Boba Milk Tea चा नैवेद्य; थायलंडमधील हा प्रकार पाहून भारतीयही म्हणाले ‘हे काय नवीन’
भारतात गणपती बाप्पाला मोदक आणि लाडूंचा नैवेद्य दाखवला जातो, पण थायलंडमध्ये बाप्पासमोर चक्क Boba Milk Tea चे कप ठेवले जातात. या अनोख्या पूजेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर यावर भन्नाट प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

गणपती बाप्पा म्हटलं की डोळ्यासमोर पहिला येतो स्वादिष्ट, गोड उकडीचा मोदक. मग त्यानंतर दुर्वा, बुंदीचे लाडू, फुलांची आरास आणि बरंच काही. हे झाल भारतात, पण तुम्हाला माहित आहे का थायलंडच्या बाप्पााला नैवेद्यात खायला काय आवडतं? हे वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. या संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
मुंबईतल्या, कोकणातल्या गणपतीप्रमाणेच थायलंडच्या गणपतीला देखील एक वेगळं महत्त्व आहे. एक प्राचीन इतिहास आहे. पण थायलंडच्या बाप्पाचा अंदाज मात्र जरा निराळा आणि हटके आहे. इथले भक्त गणपती बाप्पााला मोदक किंवा लाडू ऐवजी Boba Milk Tea चा नैवेद्य अर्पण करतात. याच अनोख्या पूजेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसतं
बँकॉक मधील UNION MALL च्या बाहेरील गणेश मंदिरातील हा व्हिडिओ आहे. बँकॉकमध्ये राहणाऱ्या PIYA PING नावाच्या महिलेने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये गणपतीच्या मूर्तीसमोर Boba Milk Tea चे अनेक कप ठेवलेले दिसतात. विशेष म्हणजे ती स्वत:ही Boba Milk Tea घेऊन गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचली होती.
मोदकांऐवजी Boba Milk Tea चा नैवेद्य
व्हिडिओमध्ये या महिलेने मंदिराची झलक दाखवली आहे. मूर्तीसमोर भरपूर बोबा मिल्कचे कप ठेवलेले व्हिडिओमध्ये दिसत आहेत. यासोबतच तिथे जवळच एक मॉल आहे जिथून तुम्ही आपल्या आवडीचे Boba Milk Tea खरेदी करू शकता आणि देवाला अर्पण करू शकता. व्हिडिओत महिलेने स्पष्ट केले की गणपतीला Boba Milk Tea चा नैवेद्य दाखवल्यास तो सगळ्या इच्छा पूर्ण करतो अशी इथल्या लोकांची श्रद्धा आहे. बँकॉकमध्ये गणपती बाप्पाचे अनेक भक्त आहेत. त्यामुळे गणेशाची पूजा इथेही केली जाते. या ठिकाणा गणेशाची अनेक मंदिरेही पाहायला मिळतात. येथील लोक गणेशाला यश, समृद्धी आणि सकारात्मकतेचे प्रतिक मानले जाते.
भारतीयांसाठी हा प्रकार ठरला चर्चेचा विषय
भारतात देशभरात सध्या गणपतीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. भारतात गणपती आणि मोदक यांचं नातं विशेष मानलं जात. त्यामुळे गणपतीासमोर हा नवा नैवेद्य बघून सोशल मीडियावर भारतीय लोकांच्या कमेंट्सचा वर्षाव पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.