कारगिल युद्ध, पत्नीला लिहिलेलं पत्र ते मुलाचा सॅल्यूट… ध्रुव जुरेलच्या वडिलांची भावुक करणारी कहाणी
ध्रुव जुरेलच्या प्रत्येक सॅल्यूटमागे एक खास आठवण दडली आहे. 1999 च्या कारगिल युद्धात वडिलांनी देशासाठी लढा दिला होता. युद्धावर जाण्यापूर्वी त्यांनी पत्नीला लिहिलेलं पत्र आजही कुटुंबासाठी भावनिक गोष्ट आहे.

ध्रुव जुरेलने अर्धशतक किंवा मोठी खेळी केल्यानंतर मैदानातून वडिलांकडे पाहत सॅल्यूट करण्याची कृती अनेकदा चर्चेत आली आहे. त्याच्या या सॅल्यूटमागे एक भावूक करणारी कहाणी आहे. ध्रुवचे वडील नेमचंद जुरेल यांनी 1999 च्या कारगिल युद्धात भारतीय सैन्यातून देशासाठी लढा दिला होता. युद्धावर जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या पत्नीला एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी स्वतःच्या बचतीपासून ते फिक्स्ड डिपॉझिटपर्यंतची माहिती दिली होती. युद्धात आपल्याला काही झालं तर पत्नीने या पैशांचा वापर कसा करावा, याबाबतही त्यांनी सूचना दिल्या होत्या. आज तोच मुलगा भारतीय संघाकडून खेळताना पाहून नेमचंद यांची छाती अभिमानाने फुलून येते.
युद्धावर जाण्यापूर्वी पत्नीला लिहिलं होतं पत्र
ध्रुव जुरेलचे वडील नेमचंद जुरेल हे भारतीय सैन्याच्या 8व्या जाट रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. 1999 मध्ये कारगिल युद्ध सुरू झाल्यानंतर त्यांना युद्धभूमीवर जावं लागलं होतं. त्यावेळी त्यांनी पत्नीला एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी आपल्या बचतीची आणि फिक्स्ड डिपॉझिटची संपूर्ण माहिती दिली होती. युद्धातून आपण परतलो नाही तर पत्नीला हे पैसे कसे मिळवता येतील, याची माहितीही त्यांनी पत्रात दिली होती. तसेच मिळालेल्या पैशांचा योग्य वापर करण्याचा सल्लाही पत्नीला दिला होता. 2008 मध्ये नेमचंद यांनी सैन्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतली.
मुलाच्या क्रिकेटसाठी कधीच पैशांची कमतरता भासू दिली नाही
कारगिल युद्धानंतर ध्रुव जुरेलचा जन्म झाला. लहानपणी तो अभ्यासात हुशार होता. मात्र, क्रिकेटची आवड वाढल्यानंतर त्याचं लक्ष खेळाकडे अधिक केंद्रित झालं. त्यामुळे अभ्यासाकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झालं. दहावीची परीक्षा त्याने कशीबशी पास केली होती, असं नेमचंद यांनी सांगितलं आहे. मात्र, मुलाला क्रिकेटमध्ये पुढे जाण्यासाठी त्यांनी नेहमीच पाठिंबा दिला. बॅट, शूज किंवा इतर क्रिकेट साहित्य खरेदी करताना त्यांनी कधीही पैशांची कमतरता भासू दिली नाही. मुलाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी शक्य ते सर्व प्रयत्न केले.
मुलाचा खेळ पाहण्यासाठी पहिल्यांदाच परदेशवारी
ध्रुवच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या वेळी नेमचंद वृंदावनमध्ये बांके बिहारींच्या दर्शनासाठी गेले होते. त्यामुळे त्यांना मुलाचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना मैदानावर उपस्थित राहून पाहता आला नव्हता. मात्र, आता ध्रुवच्या आग्रहामुळे नेमचंद आणि त्यांची पत्नी पहिल्यांदाच परदेशात गेले आहेत. न्यूझीलंडमध्ये मुलाचा खेळ पाहण्याचा आनंद ते घेत आहेत. एकेकाळी देशाच्या संरक्षणासाठी कारगिलच्या डोंगरांवर लढणारे नेमचंद आज आपल्या मुलाला भारतीय संघासाठी खेळताना पाहत आहेत.
ध्रुवचा सॅल्यूट वडिलांच्या त्यागाला समर्पित
ध्रुव जुरेल मैदानावर अर्धशतक किंवा मोठी खेळी केल्यानंतर वडिलांकडे पाहून सॅल्यूट करतो. त्याची ही कृती केवळ आनंद व्यक्त करण्यासाठी नसून वडिलांच्या सैन्यातील सेवेप्रती असलेला आदर आणि त्यांच्याबद्दलचा अभिमान दर्शवते. कारगिल युद्धात देशासाठी लढलेल्या वडिलांना मुलाकडून मिळणारा हा सॅल्यूट अनेकांसाठी भावूक करणारा ठरतो.
