
भारतीय रेल्वे आज जगातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वे नेटवर्क म्हणून ओळखले जाते. सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासासाठी आजही बहुतांश नागरिक रेल्वे प्रवासालाच प्राधान्य देतात.

मात्र तुम्हाला माहिती आहे का, भारतात अशी एक ट्रेन आहे जी थेट 12 राज्यांतून प्रवास करत उत्तर भारतापासून थेट दक्षिण टोकापर्यंत पोहोचते? ही अनोखी आणि थक्क करणारी ट्रेन म्हणजेच हिमसागर एक्सप्रेस.

हिमसागर एक्सप्रेस ही एक साप्ताहिक ट्रेन असून ती जम्मू–काश्मीरमधील श्रीमाता वैष्णो देवी कटरा येथून सुटते आणि थेट तामिळनाडूतील कन्याकुमारी येथे पोहोचते. उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंतचा हा प्रवास तब्बल 3790 किलोमीटर इतका लांब आहे.

ही ट्रेन हे अंतर साधारणतः 73 तासांमध्ये म्हणजेच जवळपास चार दिवसांमध्ये पूर्ण करते. हिमसागर एक्सप्रेसचा सर्वात मोठा विशेष म्हणजे ती भारतातील 12 राज्यांतून धावते. या दीर्घ प्रवासादरम्यान ही ट्रेन तब्बल 69 रेल्वे स्थानकांवर थांबते.

हिमसागर एक्सप्रेस ही केवळ भारतातच नव्हे तर जगातील 35व्या क्रमांकाची सर्वात लांब अंतर धावणारी ट्रेन मानली जाते. भारताच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही ट्रेन तिसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे आहे.