Bank of Baroda : बँक ऑफ बडोदाचा ग्राहकांना झटका, कर्ज झाले महाग; 12 मे पासून ईएमआयमध्ये वाढ

| Updated on: May 11, 2022 | 7:30 AM

रेपो रेटमध्ये करण्यात आलेल्या वाढीनंतर अनेक बँकांनी कर्जावरील व्याज दर वाढवले आहेत. बँक ऑफ बडोदाकडून देखील व्याज दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदाचा ग्राहकांना झटका, कर्ज झाले महाग; 12 मे पासून ईएमआयमध्ये वाढ
बँक ऑफ बडोदा
Image Credit source: tv9
Follow us on

नवी दिल्ली : भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयने (RBI) रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. आरबीआयकडून रेपो रेट 40 बेसीस पॉइंटने वाढवण्यात आला आहे. रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आल्याने आरबीआयचा रेपो रेट आता 4. 40 टक्क्यांवर पोहोचला आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केल्याने देशातील अनेक बँकांनी देखील आपल्या व्याज दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बँक ऑफ बडोदाकडून (Bank of Baroda) आपल्या व्याज दरात 10 बेसीस पॉइंटची वाढ करण्यात आली आहे. तसेच बँकेच्या वतीने एमसीएलआरमध्ये देखील 0.1 टक्क्यांची वाढ करण्यात आली असून, बँकेचा एमसीएलआर (MCLR) आता 3 महिन्यांसाठी 7.15 तर 6 महिन्यांसाठी 7.25 टक्के झाला आहे. बँक ऑफ बडोदाने आपल्या एमसीएलआरमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा परिणाम हा ईएमआयवर होणार आहे. ईएमआय वाढणार आहे. येत्या 12 मे पासून म्हणजेच उद्यापासून हे नवे दर लागू होणार आहेत.

इंडियन ओवरसीज बँकेचे व्याज दर वाढले

इंडियन ओवरसीज बँकेने देखील कर्जावरील व्याज दरात वाढ केली आहे. ओवरसीज बँकेचा सुधारीत व्याज दर 7.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. सुधारीत व्याज दर दहा मे पासून लागू करण्यात आला आहे. इंडियन ओवरसीज बँकेप्रमाणेच कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, करूर वैश्य या बँकांनी देखील आपल्या कर्जावरील व्याज दरात वाढ केली आहे. बँकांकडून कर्जावरील व्याज दरात वाढ करण्याचा धडाका सुरू असून, यामुळे सर्व प्रकारचे कर्ज महाग होणार आहेत. तसेच ईएमआयमध्ये देखील वाढ होणार आहे. आधीच देशात महागाई गगनाला भिडली आहे. आता त्यामध्ये आणखी भर म्हणजे ईएमआय महाग होणार आहे. याचा मोठा फटका हा कर्जदारांना बसण्याची शक्यता आहे.

एफडीच्या व्याज दरात वाढ

दरम्यान या सर्वांमध्ये दिलासादायक गोष्ट म्हणजे आरबीआयने रेपो रेट वाढवल्यानंतर अनेक बँकांनी जसे कर्जावरील व्याज दर वाढवले. तसेच त्यांच्याकडून ठेवीवरील व्याज देखीव वाढवण्यात आले आहे. याचा थेट फायदा हा ज्या लोकांची बँकेत एफडी आहे, अशा लोकांना होणार आहे. एफडीवरील व्याज दर वाढवण्यात आल्याने अधिक परतावा मिळणार आहे. बँकांनी वेगवेगळ्या कालावधीच्या एफडींसाठी वेगवेगळ्या प्रमाणात व्याज दरात वाढ केली आहे. याचा फायदा लाखो गुंतवणूकदारांना होऊ शकतो.