EPFO चा मोठा निर्णय, 10 दिवस थांबण्याची गरज नाही, काही तासात खात्यात येणार पैसे, नवा नियम काय?

ईपीएफओ (EPFO) आता पीएफचे पैसे काढण्यासाठी युपीआय (UPI) प्रणाली सुरू करण्याच्या तयारीत आहे. मे २०२६ पर्यंत CITES 2.0 या नवीन डिजिटल प्रणालीद्वारे क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सोपी होणार आहे.

EPFO चा मोठा निर्णय, 10 दिवस थांबण्याची गरज नाही, काही तासात खात्यात येणार पैसे, नवा नियम काय?
epfo
| Updated on: Apr 24, 2026 | 1:59 PM

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ईपीएफचे पैसे काढायचे म्हटले की ऑनलाईन अर्ज करावा लागतो. हा अर्ज केल्यानंतर बरीच प्रतिक्षा करावी लागते. विशेष म्हणजे कधी कागदपत्रे कमी पडतात, तर कधी क्लेम रिजेक्ट होण्याचेही प्रकार घडतात. पण आता ही कटकट संपवण्यासाठी EPFO (कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना) एक मोठी यंत्रणा सुरु करण्याच्या विचारात आहे. पीएफ खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान करण्यासाठी केंद्र सरकार ‘युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस’ म्हणजेच UPI प्रणाली लागू करण्याच्या तयारीत आहे. येत्या मे २०२६ च्या अखेरपर्यंत ही सेवा सर्वसामान्यांसाठी सुरु केली जाऊ शकते, असे बोललं जात आहे.

CITES 2.0 प्रणालीद्वारे होणार डिजिटल क्रांती

ईपीएफओ सध्या त्यांच्या CITES 2.0 या नवीन डिजीटल प्रणालीवर काम करत आहे. या प्रणालीचे काम अंतिम टप्प्यात आहे. यामुळे पीएफ सेटलमेंटची जुनी आणि क्लिष्ट प्रक्रिया इतिहासजमा होणार आहे. सध्या खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना क्लेम सेटलमेंटसाठी अनेक दिवस वाट पाहावी लागते, तसेच अनेकदा तांत्रिक कारणांमुळे क्लेम नाकारला जातो. मात्र, नवीन डिजिटल प्रणालीमुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान करण्यात येणार आहे.

नेमका बदल काय?

ज्याप्रमाणे आपण दुकानात क्युआर कोड स्कॅन करून किंवा युपीआय आयडी (UPI ID) वापरून झटपट पैसे पाठवतो. त्याच प्रमाणे पीएफचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. यासाठी ईपीएफओ CITES 2.0 नावाचे नवीन सॉफ्टवेअर वापरणार आहे. ही सुविधा मे २०२६ च्या अखेरपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. यातून पैसे काढण्याची पद्धत अत्यंत सोपी असेल.

  • सर्वात आधी तुम्हाला पीएफच्या पोर्टलवर किंवा ॲपवर तुमच्या UAN नंबरने लॉग इन करावे लागेल.
  • तिथे तुम्हाला तुमची एकूण शिल्लक रक्कम दिसेल.
  • तुम्हाला हवी असलेली रक्कम आणि तुमचा UPI ID टाकावा लागेल.
  • तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो टाकला की पडताळणी पूर्ण होईल.
  • काही वेळातच पैसे थेट तुमच्या बँक खात्यात जमा होतील.

या सुविधेचा लाभ घेताना खातेदारांना काही नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे. कर्मचाऱ्यांना आपल्या एकूण पीएफ शिल्लकपैकी जास्तीत जास्त ७५ टक्के रक्कमच काढता येणार आहे. उर्वरित २५% रक्कम खात्यात ठेवणे अनिवार्य असेल, जेणेकरून निवृत्तीनंतर तुमच्याकडे काहीतरी मोठी रक्कम शिल्लक राहावी, हा यामागचा उद्देश आहे.

या सुविधेचा फायदा काय?

ईपीएफचे पैसे मिळायला आधी १० ते १५ दिवस लागायचे, आता ते काम काही तासांत किंवा दिवसांत होईल. यामुळे क्लेम रिजेक्ट होण्याचे प्रमाण कमी होईल. नवीन डिजिटल प्रणालीमुळे तांत्रिक चुका कमी होतील. घरात कोणाचे आजारपण असेल किंवा तातडीने पैशांची गरज लागली, तर ऑफिसचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत. सरकार केवळ युपीआयच नाही, तर EPF योजना २०२६ आणि EPS २०२६ सारख्या नवीन योजनाही आणत आहे. यामुळे पीएफसोबतच तुमची पेन्शन आणि विम्याचे संरक्षण अधिक भक्कम होणार आहे.

Follow Us