कोरोना संकटामुळे स्मार्टफोनच्या विक्रीत घट, ‘या’ कंपनीच्या स्मार्टफोन्सची सर्वाधिक विक्री

Smartphone | एप्रिल-जून तिमाहीदरम्यान भारतात 3.24 कोटी स्मार्टफोनची आयात झाली. मात्र वार्षिक तुलनेत त्यात थेट 13 टक्के घसरण झाली आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात कडक लॉकडाऊन असूनही स्मार्टफोनच्या विक्रीत 87 टक्क्यांनी वाढ झाली होती.

कोरोना संकटामुळे स्मार्टफोनच्या विक्रीत घट, या कंपनीच्या स्मार्टफोन्सची सर्वाधिक विक्री
स्मार्टफोन
| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 7:26 AM

नवी दिल्ली: कोरोनामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट आणि वाढलेली महागाई याचा परिणाम ग्राहकांच्या क्रयशक्तीवर होताना दिसत आहे. परिणामी भारतातील स्मार्टफोनच्या विक्रीत मोठ्याप्रमाणावर घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत स्मार्टफोनची विक्री कमालीची मंदावल्याचे समोर आले आहे.

एप्रिल-जून तिमाहीदरम्यान भारतात 3.24 कोटी स्मार्टफोनची आयात झाली. मात्र वार्षिक तुलनेत त्यात थेट 13 टक्के घसरण झाली आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात कडक लॉकडाऊन असूनही स्मार्टफोनच्या विक्रीत 87 टक्क्यांनी वाढ झाली होती.

दरम्यान, देशात शाओमी या कंपनीच्या स्मार्टफोनची सर्वाधिक विक्री झाली आहे. 95 लाख स्मार्टफोन विक्रीसह या कंपनीने 29 टक्के बाजारहिस्सा राखला आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर सॅमसंग आणि रिअलमी कंपनी आहे. भारतीय बाजारपेठेत तीन महिन्यात सॅमसंगचे 55 लाख तर रिअलमीचे 49 लाख फोन विकले गेले.

जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेल आणि टाटा एकत्र

देशात येऊ घातलेल्या 5 जी नेटवर्कसाठी बड्या कंपन्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यामध्ये रिलायन्स जिओ सर्वात आघाडीवर आहे. काही दिवसांपूर्वीच रिलायन्स जिओकडून मुंबई आणि पुण्यासह देशातील अनेक शहरांमध्ये 5 जी नेटवर्कच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता भारती एअरटेल व टाटा समूहाने इंटेलबरोबर व्यावसायिक सहकार्य करत 5जी मोबाईल तंत्रज्ञानासाठी योजना आखली आहे.

भारती एअरटेलने 5 जी तंत्रज्ञानासाठी इंटेलचे तंत्र व्यासपीठ वापरण्याची योजना बुधवारी जाहीर केली. खुल्या ध्वनिलहरीचे जाळे (ओ-रॅन) त्यासाठी उपयोगात आणले जाणार आहे. भारती एअरटेलने यासाठी इंटेलबरोबर कामही सुरू केले असून काही शहरांमध्ये त्याची चाचणी घेण्यात येत आहे.

शहरांसह ग्रामीण भारतातही 5G च्या चाचण्या

सध्या चाचणीचा कालावधी 6 महिने असेल. त्यापैकी उपकरणे खरेदी आणि स्थापनेसाठी 2 महिन्यांचा कालावधी असेल. दूरसंचार विभागाच्या म्हणण्यानुसार प्रत्येक ऑपरेटरला शहरी सेटिंगव्यतिरिक्त ग्रामीण आणि अर्ध-शहरी सेटिंग्जमध्येही चाचणी घ्यावी लागेल, जेणेकरून 5 जी तंत्रज्ञानाचा फायदा देशभरातील नागरिकांना मिळेल. ही सेवा केवळ शहरी भागात मर्यादित नसावी. तथापि, आणखी एक उद्योग स्त्रोत असा दावा करतो की, कोणत्याही दूरसंचार ऑपरेटरला पंजाब, हरियाणा आणि केंद्रशासित प्रदेश चंदीगडमध्ये स्पेक्ट्रम वाटप करण्यात आलेले नाही.

संबंधित बातम्या:

जियोच्या या फोनसह वर्षभर मिळवा फ्री डेटा, फ्री कॉलिंग आणि फ्री एसएमएस

मुंबईत एअरटेल 5 जी ट्रायल नेटवर्क लाईव्ह; आधीपेक्षा अधिक डाउनलोड स्पीड मिळवण्यात यश

Airtel Black | एअरलेटची ग्राहकांसाठी खास सुविधा, मोबाईल, DTH, Fibre सारख्या सर्व सेवांसाठी एकच बिल