

आयकर विभागाने 1 जुलैपासून कर कपातीची (टीडीएस) तरतूद लागू केली आहे. 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांना हे लागू होईल. आर्थिक वर्षात 50 लाख रुपयांपेक्षा जास्त वस्तूंच्या खरेदीसाठी 0.1 टक्के टीडीएस कापणे आवश्यक आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) म्हटले की, ही तरतूद स्टॉक एक्स्चेंजच्या माध्यमातून शेअर्स किंवा वस्तूंच्या व्यवहारांना लागू होणार नाही.

आयकर विभागाने म्हटले आहे की काही विनिमय व क्लियरिंग कॉर्पोरेशनच्या माध्यमातून व्यवहारात आयकर कायद्याच्या कलम 194-Q अन्वये टीडीएसच्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यात व्यावहारिक अडचणी येत आहेत. अशा व्यवहारांमध्ये बर्याच वेळा खरेदीदार आणि विक्रेता यांच्यात परस्पर करार नसतो.

सीबीडीटीने 30 जून रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, "अशा अडचणी दूर करण्यासाठी कायद्याच्या कलम 194-Q मध्ये मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंज किंवा क्लियरिंग कॉर्पोरेशनद्वारे सिक्युरिटीज आणि वस्तूंचे व्यवहार केले जातात त्यांना टीडीएस लागू होणार नाही."

कंपन्यांनी टीडीएस कपात संबंधित कलम 194-Q ला 2021-22 च्या अर्थसंकल्पात आणले होते. ही तरतूद 1 जुलै 2021 पासून अंमलात आली आहे.