देशात मंदी आली की नाही हे सामान्य माणसाला कसे कळेल? मंदीबद्दलच्या या गोष्टी प्रत्येकाला असाव्या माहिती

| Updated on: Oct 12, 2022 | 9:30 PM

सध्या जागतिक मंदीची सर्वत्र चर्चा सुरु आहे, मात्र मंदी आली हे आपल्याला कसे कळेल? तसेच मंदी आल्यास सामान्य माणसाने काय काळजी घ्यावी?

देशात मंदी आली की नाही हे सामान्य माणसाला कसे कळेल? मंदीबद्दलच्या या गोष्टी प्रत्येकाला असाव्या माहिती
जागतिक मंदी
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई,  सहा महिन्यांपूर्वी जागतिक मंदी (Global Recession) येणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु होती. जागतिक बँकेने जारी केलेल्या नव्या विकास दाराच्या (GDP) आकड्यवरुन आपण मंदीच्या उंबरठयावर पोहोचलो आहोत. जगभरातील आर्थिक तज्ज्ञांच्या मते या आर्थिक मंदीचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसणार आहे. त्यानंतर ब्रिटन आणि युरोपला याचा मोठा फटका बसू शकतो. सुक्यासोबत ओलंही जळतंच तसाच चीनही यातून सुटणार नाही.  असे असले तरी मात्र, भारताने फार घाबरण्याची गरज नाही. अर्थातच भारतावरही याचा प्रभाव जाणवेल मात्र खूप नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अहवाल

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) ताज्या अहवालात असे म्हटले आहे की, भारत इतर देशांच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहे आणि आगामी काळात जेव्हा जागतिक अर्थव्यवस्था घसरणार आहे आणि जगातील प्रमुख देशांना मंदीचा फटका बसणार आहे. त्यावेळीही भारत मजबूत स्थितीत दिसेल.

भारताची स्थिती चांगली आहे, तथापि, मंदीच्या धोक्यात, IMF ने आर्थिक वर्ष 2022-23 साठी भारताचा आर्थिक विकास दर 6.8 टक्क्यांवर आणला आहे.  भारत हा चीन, अमेरिका आणि ब्रिटनपेक्षा अधिक मजबूत स्थितीत आहे. IMF ने अंदाज व्यक्त केला आहे की 2023 मध्ये चीनचा GDP दर  4.4 टक्के असू शकतो. तर 2023 मध्ये भारताचा अंदाजित विकास दर 6.1 टक्के असेल. मंदीचा धोका असताना हा अंदाज भारताला दिलासा देणारा आहे.

हे सुद्धा वाचा

मंदी म्हणजे काय?

जेव्हा कोणत्याही देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) सलग सहा महिने म्हणजे 2 तिमाहीत घटते, तेव्हा त्याला अर्थशास्त्रात आर्थिक मंदी म्हणतात. दुसरीकडे, जर एखाद्या देशाचा जीडीपी सलग 2 तिमाहीत 10 टक्क्यांहून अधिक घसरला, तर त्याला डिप्रेशन म्हणतात, जी अतिशय बिकट परिस्थिती असते. पहिल्या महायुद्धानंतर 1930 च्या दशकात महामंदी आली, ज्याला द ग्रेट डिप्रेशन म्हणतात.

काय होतात मंदीचे परिणाम

जेव्हा जेव्हा आर्थिक मंदी येते तेव्हा त्याचा जनजीवनावर मोठा परिणाम होतो. यामुळे जीडीपीचा आकार कमी होतो, कारण रोजच्या वस्तू महाग होतात. लोकांचा खर्च वाढतो. त्याच वेळी, या काळात उत्पन्न कमी होते. त्यामुळे लोकांची क्रयशक्ती कमी होते. पैसे वाचवण्यासाठी कंपन्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवू लागतात तेव्हा सर्वात भयावह दृश्य असते. त्यामुळे बेरोजगारी वाढते. अशा स्थितीत सर्वात मोठा फटका छोट्या उद्योगांना बसतो आणि मोठ्या प्रमाणावर छोट्या कंपन्या मंदीच्या तडाख्यात सापडतात.

याशिवाय आर्थिक मंदीच्या भीतीने गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढू लागतात. कच्चा माल महाग होण्याचा आणि विक्री कमी होण्याचा धोका कंपन्यांना असतो. अशा परिस्थितीत कंपन्या स्वत:चे संरक्षण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कामावरून काढू लागतात.

मंदीची मुख्य कारणे-

  1. मोठ्या देशांसमोर मोठी समस्या: अमेरिका, युरोप आणि चीनसारख्या अर्थव्यवस्था मंदीच्या गर्तेत अडकल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. ‘झिरो कोविड’ धोरणामुळे चीनचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कारण एकही कोरोना प्रकरण समोर येताच त्या भागात कडक निर्बंध लादले जातात. त्याचा सर्वाधिक परिणाम उद्योगांवर होत आहे. व्यवसाय ठप्प होत चालले आहे.
  2.  रशिया-युक्रेन युद्धामुळे परिस्थिती बिघडली: रशिया-युक्रेन युद्धाने मंदीला उंबरठ्यावर आणण्याचे काम केले आहे. या युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळीवर विपरीत परिणाम झाला आहे. कच्च्या तेलाच्या दरात अचानक उसळी आली. या युद्धामुळे जगभरात अनेक जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला होता. कारण रशिया आणि युक्रेन हे गहू, बाजरी यांसारख्या अनेक धान्यांचे प्रमुख निर्यातदार आहेत. युद्धामुळे त्यांच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे.
  3.  महागाईने त्रस्त सरकार : महागाई सर्वच देशांच्या सरकारसाठी त्रासदायक ठरत आहे. यूकेमध्ये महागाईचा दर 40 वर्षांतील सर्वोच्च आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी अमेरिकाही व्याजदरात सातत्याने वाढ करत आहे. भारताबाबतही बोलायचे झाले तर किरकोळ महागाईचा दर 7 टक्क्यांच्या वर आहे.

आता आपण मंदीचा प्रभाव कसा कमी करू शकतो ते जाणून घेऊया

  1.  आपत्कालीन निधी: मंदीच्या काळात तुमचा आपत्कालीन निधी हा सर्वात मोठा आधार असू शकतो. त्यामुळे कमीत कमी 6 महिन्यांच्या खर्चाचा इमर्जन्सी फंड ठेवा. ठेवा उदाहरणार्थ, भाडे किंवा ईएमआय, खाद्यपदार्थ यासारख्या अत्यावश्यक खर्चासह तुम्हाला दरमहा 40 हजार रुपयांची आवश्यकता असल्यास, तुम्ही किमान 2 लाख रुपये आपत्कालीन निधी म्हणून ठेवावे.
  2.  उधळपट्टीवर निर्बंध: मंदीचा धोका टाळण्यासाठी सर्वप्रथम लोकांनी उधळपट्टीवर आळा घातला पाहिजे. उदाहरणार्थ, रेस्टॉरंटमध्ये खाणे, बाहेर जाणे आणि मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहणे कमी करा. याशिवाय अशा वस्तू खरेदी करणे टाळा, ज्याशिवाय तुमचे काम चालू शकेल.
  3.  क्रेडिट कार्ड आणि कर्जाकडे दुर्लक्ष करा: भारतातही क्रेडिट कार्डचा ट्रेंड वाढला आहे. ‘Buy Now, Pay Later (BNPL)’ सारख्या सुविधाही आल्या आहेत. परंतु मंदीच्या काळात, त्याचा स्वैर वापर संकट अधिक गडद करू शकतो. तसेच, कोणत्याही प्रकारचे कर्ज घेणे टाळा. विशेषत: वैयक्तिक कर्जाचा विचारही करू नका कारण मंदीच्या काळात अतिरिक्त EMI एक ओझे बनू शकते.
  4.  शेअर बाजारात गुंतवणूक करणे टाळा: मंदीच्या वेळी बचतीची रक्कम शेअर बाजारात गुंतवणे टाळा. कारण मंदीची सर्वात मोठी प्रतिक्रिया शेअर बाजारातच दिसून येत आहे. तथापि, इमर्जन्सी फंडाव्यतिरिक्त जर पैसे शिल्लक असतील, तर तुम्ही निवडक समभागांमध्ये थोडे थोडे गुंतवू शकता, जर दृष्टीकोन लांब असेल तरच गुंतवणूक करू शकता. असे म्हणतात की काही लोक मंदीच्या काळात कमाईची संधी शोधतात आणि घसरत्या शेअर बाजारात सट्टेबाजी करून मोठा नफा कमवितात पण अशा कामात आर्थिक सल्लागाराची मदत जरूर घ्या. मंदीच्या काळात सोने नेहमीच आधार बनते त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो.