कुडाळच्या जागेवर राणे धनुष्यबाण चिन्हावर विधानसभा लढविणार? लवकरच शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता
कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. इतकंच नाहीतर निलेश राणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडी वेगाने सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला कोणत्याही क्षण समोर येण्याची शक्यता असताना भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे भाजप नेते निलेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुळाडमधून भाजपच्या कमळ या पक्ष चिन्हाऐवजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर लढणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता जागावाटप हे अंतिम टप्प्यात आलं आहे. अस असताना भाजपचे निलेश राणे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ-मालवण मतदारसंघात ठाकरे गटातील वैभव नाईक हे सध्या विद्यमान आमदार आहेत. वैभव नाईक यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडे प्रभावी उमेदवार नसल्याचे चित्र असताना वैभव नाईक यांच्या विरोधात निलेश राणे यांना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याच्या हालाचाली सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.