Jarange vs Darekar : सरकारला उलथून टाकण्याची भाषा करणाऱ्या जरांगे पाटलांना भाजपचं प्रत्युत्तर, थेट दिलं चॅलेंज
मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत 29 ऑगस्टपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. सरकारने त्यांच्या मागण्या मान्य न केल्यास निवडणुकीत सरकार उलथून टाकण्याची धमकी त्यांनी दिली आहे.
येत्या २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी बेमुदत उपोषण करणार असल्याची मोठी घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास सरकार उलथवून टाकेन, असं वक्तव्य करत मनोज जरांगे पाटील यांनी थेट धमकी दिल्याचे पाहायला मिळाले. तर मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी सरकारकडे फक्त दोन दिवस आहेत, असा अल्टिमेटम देत उद्यापासून बोलणार नाही, असं म्हणत सरकारला थेट इशारा देखील जरांगे पाटलांनी दिला आहे.
सरकारला उलथून टाकण्याची भाषा करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना भाजपकडून आता चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. सरकार निवडणुकीत उलथवलं जातं, असं म्हणत भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याकडून पलटवार करण्यात आलाय. तर मागच्या निवडणुकीत मनोज जरांगे पाटील आपले उमेदवार उभे करतील, सरकार उलथवण्याची संधीही निवडणुकीत असते. विविध निवडणुकीत आपले उमेदवार उभे करा आणि सत्ता उलथून टाका, असं म्हणत दरेकरांनी जरांगेंना थेट चॅलेंज दिलंय.

