AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड

गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये निवड

| Updated on: Sep 30, 2026 | 6:35 PM
Share

गडचिरोलीच्या दुर्गम भागातील विशाल मेश्राम यांची थेट लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये निवड झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, त्यांनी हे यश मिळवले. महाराष्ट्रातून एलएसईमध्ये प्रवेश घेणारे ते पहिले आदिवासी विद्यार्थी असल्याचा त्यांना आनंद आहे. गडचिरोलीच्या विकासासाठी आणि युवकांना प्रेरणा देण्यासाठी ते कटिबद्ध आहेत.

गडचिरोली जिल्ह्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि प्रेरणादायी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागातून आणि प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या विशाल मेश्राम यांची थेट लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (LSE) मध्ये निवड झाली आहे. हे यश युवकांसाठी मोठे प्रेरणास्रोत बनले आहे. मूळचे लखमापूर बोरी येथील रहिवासी असलेले विशाल, मुरखडा येथील राजीव गांधी माध्यमिक विद्यालयातून आणि चामोर्शी येथील शिवाजी महाविद्यालयातून शिक्षण घेतले.

घराची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही, त्यांनी जिद्दीने शिक्षण सुरू ठेवले. या प्रवासात त्यांना वॉर्डन उदय महाजन, संकल्प फाउंडेशनचे संस्थापक डॉ. पंकज नरुले आणि त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षक सोहम माहूरकर यांच्यासह अनेकांचे मोलाचे सहकार्य मिळाले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश मिळाल्याने त्यांना एकीकडे आनंद झाला आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील पहिले आदिवासी विद्यार्थी म्हणून देशाचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. गडचिरोलीतील युवकांनी स्वतःला कमी न समजता मोठी ध्येये ठेवावीत, असा संदेश विशाल मेश्राम यांनी दिला आहे. त्यांचे हे यश गडचिरोलीसाठी एक नवा अध्याय सुरू करणारे आहे.

Published on: Sep 30, 2026 06:35 PM

Follow Us