Murlidhar Mohol : मुख्यमंत्रिपदासाठी मुरलीधर मोहोळ यांचं नाव? सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चांवर स्पष्टच म्हणाले…
अचानक राज्यातील मुख्यमंत्रीपदासाठी मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. अनेक नेटकऱ्यांनीही त्याबाबत कमेंट्स केल्यात. मात्र मुरलीधर मोहोळ यांनीच आता ट्विट करत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवून महायुतीचं सरकार पुन्हा आलं असून सर्वाधिक जागा जिंकत भाजप सर्वात मोठा ठरला आहे. मात्र निवडणुकीच्या निकालाला आठवडा उलटला तरीही राज्याला अद्याप नवा मुख्यमंत्री मिळाला नाही. अशातच महायुतीतून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला असला तरी अधिकृत घोषणा झालेली नाही. या संभ्रमादरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली. मात्र मुरलीधर मोहोळ यांनी या चर्चांना पूर्णविराम दिलाय. त्यांनी ट्वीट करत म्हटले की, समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित आहे. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढलो. महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिला असल्याचे मुरलीधर मोहोळ म्हणाले तर आमच्या भारतीय जनता पार्टीत पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो. असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डात एकमतावर घेतले जातात, ना की सोशल मीडियाच्या चर्चेवर ! आणि पार्लिमेंट्री बोर्डात एकदा का निर्णय झाला, तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो. म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियात होणारी चर्चा अर्थहीन आहे, असे स्पष्टीकरण मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करत दिलंय.