Indrayani River Bridge Collaps : दुर्घटनेचं कारण आलं समोर, या एका कारणामुळंच पूल कोसळला, ‘मी ही बाईकसह पडलो पण वाचलो…’
पुण्यामध्ये कुंडमळ्यात इंद्राणी नदीवरचा जीर्ण पूल कोसळला ज्यामध्ये चौघांचा मृत्यू झाला. जीर्ण पूल असताना देखील लोकांची येजा या पुलावरून सुरूच होती. त्यातच पुलावर बाईक स्वारांचा देखील वाद झाला आणि त्यानंतर हा वाद पाहण्यासाठी पुलावर अजूनच गर्दी झाली. त्यामुळे पूल कोसळल्याचं स्थानिकांनी सांगितलंय.
पुण्याच्या मावळ तालुक्यातील इंद्राणी नदीवरचा जीर्ण लोखंडी पूल कोसळून चौघांचा जीव गेला. तर ५१ जण जखमी झालेत आणि दुसऱ्या दिवशीही बोटींच्या साह्याने शोध मोहीम राबविण्यात आली. संध्याकाळी साडे चार वाजेपर्यंत कोणीही न सापडल्याने रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं. पण हा पूल कोसळण्याचं कारण ३० वर्षे जीर्ण झालेला पूल असला तरी ५० ते ७० लोक एकाच वेळी या पुलावर उभे होते असं जखमी झालेल्यांनी सांगितलंय. तर पुलावर दोन बाईकवाल्यांमध्ये वाद झाला त्यामुळे वाद पाहण्यासाठी गर्दी वाढली असं स्थानिकांनी म्हंटलंय.
ज्या पुलावर चालण्यासाठी देखील मनाई होती त्या पुलावरून राजरोसपणे बाईकची येजा सुरू होती त्यामुळे स्थानिक प्रशासन काय करत होतं हा प्रश्न आहेच यावरूनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. ‘पूल धोकादायक होता तर पूर्ण प्रवेशबंदी का नाही झाली हा प्रश्न आहेच जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्याने पूल का नाही झाला प्रत्येक घटनेच्या नंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक प्रतिक्रिया येते की बचाव कार्य वेगाने सुरू आहे आणि सरकार बाधित नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं आहे पण मुळात हा प्रसंग का येतो सरकारचे इतके विभाग आहेत ते नक्की काय करतात नियोजन करून प्रशासनाकडून काम करून का घेता येत नाही आणि जर येत नसतील तर मग तुमच्या सत्तेचा अनुभव नक्की कुठला आणि त्याचा तुम्हाला उपयोग असेल पण राज्याला काय उपयोग?’ असं राज ठाकरे म्हणाले.