AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vilas Ghule Case | विलास घुले हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! सौरभ सोनवणे प्रथमच माध्यमांसमोर, नेमकं काय म्हणाले?

Vilas Ghule Case | विलास घुले हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! सौरभ सोनवणे प्रथमच माध्यमांसमोर, नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Jun 24, 2026 | 3:50 PM
Share

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात घडलेल्या विलास घुले हत्या प्रकरणामुळे परिसरातील वातावरण चांगलेच तापले असून या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळताना दिसत आहे. हॉटेलमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या वादादरम्यान मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या हॉटेल मालक विलास घुले यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याचे नाव समोर आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मृत विलास घुले यांच्या नातेवाईकांनी सौरभ सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. आरोपींना तातडीने अटक होत नसल्याच्या निषेधार्थ नातेवाईक आणि नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत विलास घुले यांचा मृतदेह तब्बल 11 तास केज पोलीस ठाण्यासमोर ठेवून आंदोलन केले होते. अखेर पुरवणी जबाबामध्ये सौरभ सोनवणे याच्या नावाचा उल्लेख नोंदविण्यात आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर सौरभ सोनवणे यांनी प्रथमच माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, “विलास घुले यांची हत्या ही अत्यंत दुर्दैवी आणि चुकीची घटना आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. मात्र घटनेच्या दिवशी मी दुपारपर्यंत येडेश्वरी साखर कारखान्यावर होतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत घरीच होतो. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असून माझी गाडीही घराजवळ असल्याचे त्यात स्पष्ट दिसत आहे.”

पुढे बोलताना त्यांनी राजकीय हेतूने आपल्यावर आरोप करण्यात येत असल्याचा दावा केला. “मी खासदारांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत असतो. हे काहींना खटकत असल्यामुळेच माझे नाव या प्रकरणात गोवले जात आहे का, असा प्रश्न आम्हाला पडतो,” असे ते म्हणाले.

तसेच या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. “सत्य समोर आले पाहिजे. कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार आहे. माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. पोलिसांनी कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपासले असून त्यातूनही वस्तुस्थिती स्पष्ट होईल. पोलीस प्रशासन सत्य जनतेसमोर आणेल, असा मला विश्वास आहे,” असे सौरभ सोनवणे यांनी सांगितले.

दरम्यान, या हत्या प्रकरणाच्या तपासाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

Published on: Jun 24, 2026 03:50 PM

Follow Us