Onion Rate : कांदा दराचा प्रश्न पेटला, लासलगावात आवक घटली, राहुरीत स्वाभिमानीचा रास्तारोको

| Updated on: Aug 16, 2022 | 3:22 PM

ऊसानंतर कांदा हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. असे असताना यामधून शेतकऱ्यांना दोन पैसेही मिळत नाहीत. गेल्या 5 महिन्यापासून हीच स्थिती ओढावली आहे. मध्यंतरी नाफेड कांद्याची खरेदी केली तेव्हाच शेतकऱ्यांना सरासरीप्रमाणे दर मिळाला. नाफेडचे उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर त्यांनी खरेदी बंद करताच पुन्हा दरात कमालीची घसरण झाली आहे. कांदा दराबाबत निर्णय घ्यावा अन्यथा 16 ऑगस्टपासून शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठीच आणू नये असे आवाहन कांदा उत्पादक संघटनेने केले होते.

Onion Rate : कांदा दराचा प्रश्न पेटला, लासलगावात आवक घटली, राहुरीत स्वाभिमानीचा रास्तारोको
कांदा दरवाढीसाठी आता विक्री बंद करण्याचे आवाहन कांदा उत्पादक संघटनेने केले आहे.
Follow us on

लासलगाव : गेल्या चार महिन्यापासून (Onion Rate) कांद्याच्या दरातील घसरण ही सुरुच आहे. दरावर कुणाचाही अंकूश हा राहिलेला नाही. शिवाय व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारचा परिणाम हा कांदा दरावर होत आहे. कांद्याला किमान 25 रुपये किलो दर मिळावा अशी मागणी (Onion Growers Association) कांदा उत्पादक संघटनेने केली होती. शासनाने ही मागणी मान्य न केल्यास शेतकऱ्यांनी (Onion) कांदा विक्रीच करु नये असे आवाहन करण्यात आले होते. घटत्या दरामुळे शेतकऱ्यांचे वांदे होत होते तर आता व्यापारी आणि ग्राहकांचेच वांदे करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यानुसार लासलगाव कांदा मार्केटमध्ये कांद्याची आवक ही घटली होती तर दुसरीकडे कांद्याला किमान 30 रुपये किलो असा दर मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राहुरी शहरातील नगर-मनमाड या महामार्गावर रास्तारोको केला होता.

उन्हाळी हंगामापासून दरात घसरण सुरुच

उन्हाळी हंगामातील कांदा बाजारात दाखल होताच 30 रुपये किलोवर असलेला कांदा थेट 1 रुपयांवरही आला होता. कांद्याची आवक अधिक आणि मागणी कमी यामुळे ही स्थिती ओढावली होती. पण गेल्या 5 महिन्यांपासून कांद्याच्या दरात सुधारणाच झालेली नाही. शिवाय यामध्ये प्रशासनाचा कसलाही हस्तक्षेप नाही. त्यामुळे व्यापारी आणि होणारी मागणी यावरच कांद्याचे दर अवलंबून आहेत. सध्या खरीप हंगामतील कांदे लागवडीची लगबग सुरु झाली आहे. तर दुसरीकडे बाजारपेठत कांद्याला केवळ 10 ते 12 रुपये किलो असा दर आहे.

कांदा उत्पादक संघटनाही आक्रमक

ऊसानंतर कांदा हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. असे असताना यामधून शेतकऱ्यांना दोन पैसेही मिळत नाहीत. गेल्या 5 महिन्यापासून हीच स्थिती ओढावली आहे. मध्यंतरी नाफेड कांद्याची खरेदी केली तेव्हाच शेतकऱ्यांना सरासरीप्रमाणे दर मिळाला. नाफेडचे उद्दिष्ट साध्य झाल्यानंतर त्यांनी खरेदी बंद करताच पुन्हा दरात कमालीची घसरण झाली आहे. कांदा दराबाबत निर्णय घ्यावा अन्यथा 16 ऑगस्टपासून शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठीच आणू नये असे आवाहन कांदा उत्पादक संघटनेने केले होते. त्याला पहिल्या प्रतिसादही मिळाला आहे. कांदा बियाणे तसेच रासायनिक खतांच्या किमती वाढल्या असल्याने मिळणारा भाव हा शेतकऱ्याला परवडत नसल्याने कांद्याच्या भावात सुधारणा व्हावी याकरता हा स्वयंस्फूर्तीचा बंद पुकारण्यात आला होता.

राहुरीत रास्तारोको

कांद्याला प्रति 30 किलो प्रमाणे भाव मिळावा, निर्यातीला प्रति क्विंटल 500 रूपये अनुदान मिळावे अशा मागण्या करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी राहुरी शहरात नगर-मनमाड महामार्ग अडवत रास्ता रोको केला. दरम्यान रस्त्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. मागण्या मान्य केल्या नाही तर यानंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.