कापूस नसल्याने जिनींग उद्योग ठप्प; कापूस उत्पादक असा आला अडचणीत

कापसाला प्रतिक्विंटल किमान 10 ते 12 हजार रुपये भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी कापूस विकायला तयार नाहीत.

कापूस नसल्याने जिनींग उद्योग ठप्प; कापूस उत्पादक असा आला अडचणीत
Cotton rates
Image Credit source: tv9marathi
| Edited By: | Updated on: Feb 25, 2023 | 12:02 PM

जळगाव : जिल्ह्यातील कापूस हे शेतकऱ्यांचा पांढरा सोनं यावर्षी कापसाने शेतकऱ्यांचा (Farmers) मोठा वांधा केलाय. रब्बीचा हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे. पण खरीप हंगामात पिकलेला कापूस अजून विकला गेलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा (Cotton Growers) धीर सुटत चालला आहे. असं असलं तरी मायबाप सरकार मात्र कापूस प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यायला तयार नाहीय. कापसाला प्रतिक्विंटल किमान 10 ते 12 हजार रुपये भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी कापूस विकायला तयार नाहीत. कापूस प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

खान्देशातल्या 70 टक्के जिनींग बंद

जळगाव जिल्ह्यात 80 टक्के शेतकऱ्यांकडे कापूस पडून आहे. कापूस नसल्याने जिनींग उद्योग ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. खान्देशातल्या 70 टक्के जिनींग आजच बंद आहेत. यापुढेही अशीच परिस्थिती राहिली तर त्यांचीही धडधड थांबण्याची भीती आहे. शेतकऱ्यांना परवडेल असा भाव निश्चित करून सरकारने शेतकऱ्यांचा कापूस सीसीआयच्या माध्यमातून खरेदी करायला. हा कापूस सहकारी सूतगिरण्यांनाही देता येईल. त्यामुळे कापसाची कोंडी फुटण्यास मदत होऊ शकते.

शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते मांडतात व्यथा

सध्या कापसाला साडेसात हजारापेक्षा जास्त भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आहे. आजही जवळपास 80 टक्के कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. या कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा बदनापूर तालुक्यातील नागठाणा येथील शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते लक्ष्मण हिरे यांनी त्यांच्या शाहिरीच्या माध्यमातून मांडली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. हा आवाज सरकारपर्यंत पोहचावा. योग्य तो भाव मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

शेतकरी दुहेरी संकटात

गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या कापसाला उच्चांकी भाव मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा झाल्याने यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशी पिकाची लागवड केली. त्यात चालू हंगामाच्या सुरुवातीला साडेनऊ हजार प्रतिक्विंटल भाव मिळाला. मात्र हाच भाव जानेवारीपर्यंत ८ हजारांवर स्थिरावला आहे. कापसाचे भाव वाढवण्यासाठी आंदोलनेही केली जात आहेत. दरवर्षी मार्च महिन्यापर्यंत कापसाचे भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांना मोठी आशा आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी घरातच कापूस साठवून ठेवला आहे. आता या साठवलेल्या कापसापासून डस्टी कॉटनबर्ग खाजेमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडल्याचे चित्र आहे.