वीज गेल्यावर इलेक्ट्रिक कार देणार घराला बॅकअप, पंखा-लाईट किती वेळ चालणार?

वीज गेल्यानंतर इलेक्ट्रिक कारने घरातील पंखा आणि लाईट चालू करू शकतो का? कोणती उपकरणे आपण वापरू शकतो? जाणून घ्या सविस्तर

वीज गेल्यावर इलेक्ट्रिक कार देणार घराला बॅकअप, पंखा-लाईट किती वेळ चालणार?
| Updated on: Nov 01, 2026 | 9:41 PM

वीज गेल्यानंतर घरात इन्व्हर्टर किंवा जनरेटरचा वापर करणे सामान्य आहे. मात्र, तुमची इलेक्ट्रिक कारसुद्धा घरासाठी विजेचा पर्याय ठरू शकते, हे तुम्हाला माहिती आहे का? पेट्रोल आणि डिझेल कारच्या तुलनेत इलेक्ट्रिक कारमध्ये ही सुविधा उपलब्ध होऊ शकते. काही इलेक्ट्रिक कारमध्ये दिलेल्या विशेष तंत्रज्ञानामुळे त्यांच्या बॅटरीमधील वीज वापरून पंखा, एलईडी लाईट, मोबाईल चार्जर आणि लॅपटॉप यांसारखी उपकरणे चालवता येतात. या तंत्रज्ञानाला V2L (Vehicle to Load) असे म्हणतात. मात्र, ही सुविधा प्रत्येक इलेक्ट्रिक कारमध्ये उपलब्ध नसते.

V2L म्हणजेच व्हेईकल टू लोड हे तंत्रज्ञान इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीमधील वीज बाहेरील उपकरणांना पुरवण्याचे काम करते. कारच्या हाय-व्होल्टेज बॅटरीमध्ये साठवलेली DC (डायरेक्ट करंट) वीज इन्व्हर्टरच्या मदतीने AC (अल्टरनेटिंग करंट) विजेमध्ये बदलली जाते. त्यानंतर कारमधील विशेष सॉकेट किंवा एक्स्टर्नल पॉवर आउटलेटच्या माध्यमातून ही वीज वापरता येते.

Loading...

यासाठी काही कारमध्ये थेट पॉवर आउटलेट दिलेले असते, तर काही मॉडेलमध्ये विशेष अ‍ॅडॉप्टरची आवश्यकता असते. या सुविधेच्या मदतीने पंखा, मोबाईल चार्जर, लॅपटॉप आणि एलईडी लाईट यांसारखी छोटी उपकरणे चालवता येतात.

एका चार्जमध्ये किती तास चालतील पंखा आणि लाईट?

इलेक्ट्रिक कारमधून किती वेळ वीज वापरता येईल, हे कारची बॅटरी क्षमता आणि उपकरणांच्या वीज वापरावर अवलंबून असते. उदाहरणार्थ, एखाद्या इलेक्ट्रिक कारमध्ये 40 kWh क्षमतेची बॅटरी असेल, तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा साठवलेली असते. मात्र, संपूर्ण बॅटरी घरातील उपकरणांसाठी वापरणे योग्य नाही. कार चालवण्यासाठीही पुरेसा चार्ज शिल्लक ठेवणे आवश्यक आहे.

समजा, तुम्हाला 60 वॅटचा एक पंखा आणि प्रत्येकी 10 वॅटचे चार एलईडी दिवे चालवायचे आहेत. अशा वेळी एकूण वीज वापर 100 वॅट होईल. ही उपकरणे सलग 10 तास सुरू ठेवल्यास सुमारे 1 युनिट वीज खर्च होईल. त्यामुळे पुरेसा बॅटरी चार्ज आणि V2L सुविधा असलेली इलेक्ट्रिक कार पंखा व दिवे अनेक तास चालवण्यासाठी उपयोगी ठरू शकते.

कोणती उपकरणे चालवता येतात?

पंखा आणि एलईडी लाईट, मोबाईल चार्जर, लॅपटॉप आणि टॅबलेट, छोटी इलेक्ट्रॉनिक उपकरणे चालवू शकतो.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us