टेस्लानंतर आता या देशाने बनवली हवेत उडणारी कार, या दिवशी होणार लॉन्च, किंमत किती?
टेस्ला कंपनीच्या नंतर आता भारतात येणार हवेत उडणारी कार. कधी होणार लॉन्च आणि किती असणार कारची किंमत. जाणून घ्या सविस्तर.

जगभरात हवेत उडणाऱ्या कारची चर्चा सुरू असतानाच आता चीननेही या क्षेत्रात मोठी तयारी केली आहे. एलन मस्क यांच्या टेस्लानंतर आता चीनची इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी XPeng (एक्सपेंग) आपली नवीन हवेत उडणारी कार बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. कंपनी 2027 मध्ये दोन आसनी इलेक्ट्रिक फ्लाइंग व्हेईकल सादर करू शकते. या वाहनाची किंमत जवळपास 3 लाख डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 2.18 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. सुरुवातीला चीनमधील ग्रामीण भागात मनोरंजन आणि अॅडव्हेंचरची आवड असणाऱ्या ग्राहकांसाठी हे वाहन उपलब्ध केले जाणार आहे.
XPeng च्या या फ्लाइंग कारचे डिझाइन सामान्य कारपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. यामध्ये रस्त्यावर चालण्यासाठी चाके नसून सहा इलेक्ट्रिक प्रोपेलर देण्यात आले आहेत. या प्रोपेलरच्या मदतीने हे वाहन हवेत उड्डाण करू शकते. यात दोन प्रवाशांना बसण्याची सुविधा असून केबिनचा आकार Fiat 500 कारच्या केबिनसारखा असल्याचे सांगितले जात आहे.
या फ्लाइंग व्हेईकलचे नियंत्रण जॉयस्टिकच्या मदतीने करता येईल. विशेष म्हणजे, आधीच निश्चित केलेल्या मार्गावर सतत मॅन्युअल कंट्रोल न करताही ते उड्डाण करू शकते.
अवघ्या 5 मिनिटांत उडवता येणार?
कंपनीच्या फ्लाइंग व्हेईकल व्यवसायाचे सीईओ डेली झाओ यांनी लिस्बनमधील वेब समिटमध्ये या प्रकल्पाची माहिती दिली. त्यांच्या दाव्यानुसार, सामान्य व्यक्तीलाही अवघ्या 5 मिनिटांत हे वाहन उडवण्याचे प्रशिक्षण देता येऊ शकते. कंपनी जवळपास 10 वर्षांपासून या फ्लाइंग कारच्या विकासावर आणि चाचण्यांवर काम करत आहे.
या वाहनाला चीनच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाकडून मर्यादित वापरासाठी परवानगी मिळाल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र, सामान्य ग्राहकांना हे वाहन उडवण्यासाठी कोणते प्रशिक्षण किंवा परवाना आवश्यक असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
2.18 कोटींच्या किमतीत मिळणार खास व्हॅन
या फ्लाइंग कारची किंमत जवळपास 3 लाख डॉलर म्हणजेच सुमारे 2.18 कोटी रुपये असू शकते. विशेष म्हणजे, या किमतीत केवळ उडणारे विमानच नाही तर ते वाहून नेण्यासाठी सहा चाकांची खास व्हॅनही मिळणार आहे.
सध्या XPeng च्या या फ्लाइंग व्हेईकलची उड्डाण क्षमता मर्यादित आहे. हे वाहन एका वेळी जवळपास 30 किलोमीटर अंतर पार करू शकते. तसेच ते जास्तीत जास्त 1 किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचू शकते.