ना रस्ता, ना पूल, पाणी 40.74 किलोमीटर चालली ही बाईक, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
ना रस्ता, ना पूल, आता समोर आली पाण्यावर चालणारी बाईक. झांग शुए यांनी 40.74 किमी पाण्यावर बाईक चालवून बनवला नवीन रेकॉर्ड. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद.

चीनमधील मोटारसायकल उत्पादक कंपनी ZXMOTO चे संस्थापक झांग शुए यांनी एक अनोखा विश्वविक्रम केला आहे. त्यांनी विशेष तंत्रज्ञानाने बदल केलेली मोटारसायकल पाण्याच्या पृष्ठभागावर तब्बल 40.74 किलोमीटर चालवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले. चीनमधील हुनान प्रांतातील मियांग मियाओ स्वायत्त काउंटी परिसरातील जिनजियांग नदीवर त्यांनी हा पराक्रम केला. यापूर्वीचा 31.8 किलोमीटरचा विक्रम त्यांनी मोडला.
मोटारसायकलमध्ये केले विशेष बदल
हा विक्रम करण्यासाठी झांग शुए यांनी ZXMOTO MX450 या मोटारसायकलमध्ये खास बदल केले. बाइकला पाण्यावर तरंगण्यास आणि संतुलन राखण्यास मदत करणाऱ्या विशेष स्की, मोठी इंधन टाकी आणि अतिरिक्त वॉटरप्रूफिंगची व्यवस्था करण्यात आली. या बदलांमुळे बाइकचे पाण्यावरील नियंत्रण टिकवून ठेवणे आणि दीर्घकाळ प्रवास करणे शक्य झाले.
पाण्यावर कशी धावते ही बाइक?
सामान्य मोटारसायकलप्रमाणे सुरुवातीला या बाइकला जमिनीवर वेग दिला जातो. त्यानंतर ती पाण्याच्या पृष्ठभागावर धावू लागते. बाइकच्या पुढील भागातील विशेष स्की तिला पाण्यावर स्थिर ठेवण्यास आणि दिशा नियंत्रित करण्यास मदत करतात. मागील टायर पाणी मागे ढकलतो, त्यामुळे बाइकला पुढे जाण्यासाठी आवश्यक जोर मिळतो.
विशेष म्हणजे, या मोटारसायकलमध्ये सामान्य वॉटरक्राफ्टप्रमाणे स्वतंत्र समुद्री प्रोपल्शन यंत्रणा वापरण्यात आलेली नाही. जमिनीवर मिळवलेला वेग, पुढील स्की आणि मागील टायरमुळे निर्माण होणारा जोर यांच्या समन्वयातून ती पाण्यावर पुढे जाते.
अनेक फेऱ्या मारून पूर्ण केले अंतर
40.74 किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्यासाठी झांग यांनी नदीवर एकाच सरळ प्रवासाऐवजी वारंवार पुढे-मागे फेऱ्या मारल्या. या प्रयत्नात मोठी इंधन टाकी आणि अतिरिक्त वॉटरप्रूफिंग महत्त्वाचे ठरले.
झांग शुए यांचा हा विक्रम अनेक वर्षांच्या प्रयत्नांचे फलित आहे. त्यांनी 2009 मध्ये पहिल्यांदा मोटारसायकल पाण्यावर चालवण्याचे प्रयोग सुरू केले होते. सुरुवातीच्या प्रयत्नांमध्ये त्यांना चार वेळा पाण्यात पडावे लागले आणि ते केवळ 20 मीटर अंतर पार करू शकले. मात्र, सातत्याने प्रयोग आणि तांत्रिक बदल करत त्यांनी अखेर 40.74 किलोमीटरचे अंतर पार करून जुना विक्रम मोडला.