भाजपला सर्वात मोठा धक्का; विधानपरिषदेच्या निवडणुकीत दोन बालेकिल्ले ढासळले, अचानक काय घडलं?
भाजपला सर्वात मोठा धक्का बसला आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत दोन बालेकिल्ले गमावले आहेत. भाजपच्या पराभावची जोरदार चर्चा होत आहे.

बिहार विधानपरिषदेच्या सर्व 8 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत सर्वात धक्कादायक निकाल हा पटना शिक्षक मतदारसंघात लागला आहे. सलग 30 वर्षांपासून पटना शिक्षक मतदारसंघावर वर्चस्व असलेल्या भाजपच्या नवल किशोर यादव यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आरजेडीच्या संजीव कुमार यांनी भाजपच्या नवल किशोर यादव यांना धूळ चारली. पटना शहरात भाजपची प्रचंड ताकद असल्याचे बोलले जायचे.
भाजपचे मागील दोन महिन्यात दोन बालेकिल्ले ढासळले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांचा बालेकिल्ला मानला जाणारा बांकीपूर विधानसभा मतदारसंघात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत जनसुराजच्या प्रशांत किशोर यांचा विजय झाला. तर नवल किशोर यांच्या राजकीय करिअरची सुरुवात आरजेडीपासून सुरू झाली. आरजेडी पक्षाच्या माध्यमातून विधानपरिषदेत पोहोचले होते. पुढे लालू प्रसाद यादव यांच्यासोबत वाद झाल्यानंतर भाजपमध्ये सामील झाले. तेव्हापासून पटना शिक्षक मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व आहे. यंदाही भाजपने नवल किशोर यादव यांना उमेदवारी दिली होती. परंतु यंदा नवल किशोर यादव यांना पराभवाचा सामना करावा लागला.
नवल किशोर यादव यांचा पराभव का झाला?
संजीव कुमार यांनी नवल किशोर यादव यांना 1058 मतांनी धूळ चारली. तर या निवडणुकीत जनसुराजच्या उमेदवाराला 1500 हून अधिक मते मिळाली. प्रशांत किशोर यांचा पक्ष भाजपची मते स्वत:कडे वळवण्यास यशस्वी ठरलाय. जातीय समीकरण देखील महत्वाचं ठरलं. संजीव कुमार हे भूमिहार समुदायातून येतात. तर नवल किशोर यादव हे यादव समाजातून येतात. बिहारमध्ये 8 जागांपैकी 5 जागांवर भूमिहार समाजाचे उमेदवार विजयी ठरले आहेत. नवल किशोर यादव यांच्याविरोधात सत्ताविरोधी लाट होती. एकीकडे शिक्षक वर्ग 7 व्या वेतनाची मागणी करत होते. परंतु या मुद्द्यावरून भाजप सरकार बॅकफूटवर गेलं होतं.
बिहारमधील शहरी मतदारसंघ भाजपचे बालेकिल्ले मानले जातात. परंतु नुकत्याच झालेल्या 2 निवडणुकीत भाजपला शहरी मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला. बांकीपूरमधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर आता पटनामध्ये नवल किशोर यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. तर पटनाच्या पदवीधर मतदारसंघात भाजपचा मित्रपक्ष जेडीयूने बाजी मारली. भाजपच्या पराभावची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
